मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात कोरोना लसीवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर आणि खासकरुन केंद्रातील मराठी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढायचे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं, की आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची. हे कोणतं राजकारण सुरू आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या भयानक परिस्थितीत आम्हाला यामध्ये राजकारण आणायचं नाही, तुम्हीही आणू नका. भाजपचे जे आमचे सहकारी आहेत, ते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. त्यांचे देखील 105 आमदार या राज्यातील जनतेने निवडून दिले आहेत, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. किमान त्यांच्यासाठी तरी त्यांनी लस घेऊन यायला हवी, आमचं आम्ही बघू. महाराष्ट्र तुमचा देखील आहे जेवढा आमचा आहे. महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, टीकाकारांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही हे तपासावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं रक्त तुमच्या धमन्यांमध्ये असेल, तर तुम्ही असं एकमेकांवर टीका करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण आज संकट भयंकर आहे, असं राऊत म्हणाले. कोरोनाविरोधातील जी लढाई आहे, ही आमची व्यक्तीगत लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का? असा सवालही राऊतांनी केला.
ते म्हणाले की, लस ही माणसाला या क्षणी जीवनावश्यक गोष्ट आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी म्हणातात, जागृती होण्यासाठी लस उत्सव साजरा करा दुसरीकडे महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याचं कारण काय तर इथे भाजपाचं राज्य नाही. इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात, असं राऊत म्हणाले.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा केला गेला आहे. गुजरातमध्ये तर कोरोनाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत की महाराष्ट्र मॉडेल राबवा. महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्या कमी असूनही त्यांना 1 कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता असताना, आठ लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली जात आहेत, असं राऊत म्हणाले.