अहमदनगर : कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतातही कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. भारतातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात असून संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार पार पोहोचला आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्रातील एक गाव अद्यापही कोरोनामुक्त आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव असलेलं हिवरे बाजार गाव अद्यापही कोरोनामुक्त आहे. या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.


कोरोनाच्या प्रश्वभूमीवर आदर्शगाव हिवरे बाजार गावाने नवी आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे या गावात कोरोनाला एन्ट्री तर सोडाच, परंतु गावातील कोणीही कोरोना बधित होणार नाही याचे नियोजन केले आहे. हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी पुढाकार घेत संपूर्ण गावातील ग्रामस्थांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यातून संपूर्ण गाव कोरोनामुक्त असल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण गावाची तपासणी करणारं हिवरे बाजार हे पहिले गाव आहे.


पाहा व्हिडीओ : अहमदनगरमधील 'हिवरे बाजार' ग्रीन झोनमध्ये; संपूर्ण गावाची तपासणी करणारे पहिलं गाव



गेल्या 3 महिन्यापासून देशावर आलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी होत नाहीये. कोरोनाबधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार ने एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. 22 मार्च पासूनच हिवरे बाजार गावाने नवी आचारसंहिता गावात लागू केली होती. गावात येणारे सर्व रस्ते बंद करून संपूर्ण गावात सॅनिटायझर वाटण्यात आले. इतकेच नाही तर आता संपूर्ण गावाची कोरोना तपासणी करण्यात आली. हिवरे बाजार मधील कोरोना ग्रामसुरक्षा समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि जिल्हा परिषदेच्या 9 आरोग्य विभागातर्फे गावात असलेल्या गावातील 303 कुटुंबातील 1400 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यात एकही व्यक्ती आजारी आढळून आली नाही.


हिवरे बाजार गावाने घेतलेल्या खबरदारीमुळे सुदैवाने गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागांबरोबर आता कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात देखील दिसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हिवरेबाजारने केलेले नोयोजन इतर गावांनी केले तर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल यात काही शंका नाही.