मुंबई : कोरोनाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
परीक्षा ऑफलाईन घ्यावी अशी ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी
महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाईन घ्यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन नको अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतात किंवा 9 वी 11 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याबाबतचा निर्णय होतो, मग 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत परीक्षा घेण्यावर सरकार ठाम का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कोरोना बाधित झालो तर आमचं कुटुंब देखील कोरोना बाधित होऊ शकतं याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आणि अजूनही ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.