पंढरपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करुन माढा लोकसभा जिंकून देणारे कल्याणराव काळे यांनी अवघ्या दीड वर्षात भाजपाला सोडचिट्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (8 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळा आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर इथल्या श्रीयश मंगल कार्यालय इथे सकाळी हा कार्यक्रम होणार आहे.
सध्या पंढरपूरची पोटनिवडणूक सुरु असून कल्याण काळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीने अर्धी लढाई जिंकली आहे. पंढरपूरचे कल्याणराव काळे हे 2014 साली अपक्ष माढा विधानसभा मतदारसंघातून लढले होते, त्यावेळी त्यांना 62 हजार मते मिळाली होती. वास्तविक पंढरपूर मतदारसंघ सांगोला, माढा, मोहोळ आणि पंढरपूर अशा चार विधानसभा मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात विभागाला गेला. असं असलं तरी काळे यांचा प्रभाव या चारही मतदारसंघात असल्याने राष्ट्रवादीला कल्याणराव काळे हे चार विधानसभा व दोन लोकसभा मतदारसंघात मोठे फायदेशीर ठरणार आहेत.
कल्याणराव काळे यांच्याकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना, सीताराम साखर कारखाना, निशिगंधा बँक, श्रीराम शिक्षण संस्था, जनकल्याण हॉस्पिटल, आयटीआय, नर्सिंग कॉलेज, चंद्रभागा डेअरी, अनेक पतसंस्था असे संस्थांचे जाळे असून हजारो कार्यकर्ते यातून कल्याणराव काळे यांनी तयार केले आहेत .
कल्याणराव काळे यांनी भाजप सोडू नये यासाठी मोहिते पाटील, खा रणजित निंबाळकर यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गजांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न गेल्या चार दिवसात करुन पहिला. मात्र भाजप प्रवेश करुनही शेतकऱ्यांच्या अडचणी सुटत नसल्याने कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या हाकेला प्रतिसाद देत राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसात राज्यात सत्तांतर होऊनही सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार यांनी सातत्याने काळे याना सहकार्य केले होते. यामुळेच कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर काळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काळे हे काँग्रेस पक्षात होते. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काळे यांचा चांगला फायदा भाजपाला मिळाला मात्र त्यांच्याकडे निवडणुकीनंतर पूर्ण दुर्लक्ष केल्याने काळे यांचे कार्यकर्ते भाजपवर नाराज झाले होते. यातूनच कार्यकर्ते आणि शेतकरी सभासदांशी चर्चा करीत काळेंनी हा मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या उपस्थितीत आता कल्याणराव काळे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसवासी होणार असून पोटनिवडणुकीत भाजपाला हा मोठा हादरा मनाला जातो आहे.