शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेल्या बस भाडेवाढप्रकरणी संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला न आल्याने संतप्त महापौरांनी, तुकाराम मुंढे यांना परत न्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विद्यार्थ्यांच्या बस भाड्यात अचानक वाढ केल्याने, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. आयुक्त कुणाल कुमार यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करुन वेळ ठरवली होती. मात्र या बैठकीला तुकाराम मुंढे आलेच नाहीत.
त्यांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले. आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही, असा निरोप तुकाराम मुंढेंनी पाठविला.
या प्रकारामुळे महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. ‘ज्यांना कसलाही अधिकारी नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही’ असं सांगितलं.
मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी पुणेकरांचं प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांना गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे 60 टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नाही, असे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
भाजपनेच तुकाराम मुंढे यांची मागणी केली होती. याबाबत विचारलं असता, महापौर म्हणाल्या, "ते चांगलं काम करतील असं वाटलं होतं. त्यांच्या या हटवादी भूमिकेमुळे कितीही चांगलं काम केलं तरी उपयोग नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत बोलवावे"