मुंबई: मराठमोळ्या आयपीएस अधिकाऱ्याला थेट अमेरिकेने सॅल्युट केला आहे. हैदराबादमधील सायबराबादचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना अमेरिकेने 'ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड' देऊन गौरवलं आहे.


मानवी तस्करी रोखण्यासाठी महत्वपूर्ण काम करणाऱ्या जगभरातील प्रेरणादायी व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार महेश भागवत यांना देण्यात आला.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टिलरसन आणि सल्लागार इवांका ट्रम्प यांनी महेश भागवत यांना हा पुरस्कार प्रदान केला.

माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून मुक्त करुन, माणसाप्रमाणे वागणूक देण्यासाठी मानवी तस्करीविरोधी कार्यकर्त्यांचं मोठं काम आहे. अशा माणसांना त्यांचे मुलभूत अधिकार परत करणे हे त्यांचं प्रमुख ध्येय.

हैदराबाद-राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी अशाच प्रकारचं काम केलं आहे. त्याच कार्याचा गौरव अमेरिकेने केला.

हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच अमेरिकेत पार पडला. काही अपरिहार्य कारणास्तव भागवत मात्र या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

महेश भागवत हे महाराष्ट्रातील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.  गेल्या 13 वर्षापासून ते मानवी तस्करीविरोधात कार्य करत आहेत.

रक्तात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

काही दिवसांपूर्वीच महेश भागवत यांच्या टीमने रक्तात भेसळ करमाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हेनस रक्तपेढीवर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतलं. सायबराबादचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी याबाबत माहिती दिली.