मुंबई : कोरोनाच्या भीतीने आणि रोजगार मिळत नसल्याने अनेक नागरिक राज्यांतर्गत तसेच राज्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. खाजगी गाड्यांमध्ये नागरिक जीव धोक्यात घालून आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोक पायी देखील आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे  स्थलांतर याबाबत माहिती घेतली. करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीतअसलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

India Lock Down | विरारमध्ये पायी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोची धडक; चौघांचा मृत्यू, तीन जखमी
ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले. राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.


गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. संचारबंदीच्या काळात कुणीही अनावश्यक प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यात मजुरांचं प्रमाण जास्त आहे. आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर राज्यातून मुंबईत काम करण्यास आलेल्या कामगारांनी विविध मार्गांनी शहरं सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.