मुंबई : कोरोना विषाणूंशी जागतिक युद्ध सुरु आहे आणि हे युद्ध घाबरुन जिंकता येणार नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाबद्धल ते राज्याला संबोधित करत होते. राज्य सरकारने कोरोना विषाणूंच्या संकटाशी लढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच त्यांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आणि घरातच बसून काम करण्याच आवाहन केलं. कोणतंही युद्ध घाबरुन लढता येत नाही, तर युद्ध जिंकण्यासाठी जिद्दीची आवश्यकता असते, असंही त्यांनी सांगितलं आहे.


कोरोना विषाणूंशी सुरु असलेलं युद्ध हे फक्त आपल्या राज्याचं किंवा देशाचं नसून संपूर्ण जगाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे जागतिक महायुद्ध असल्याचं सांगून या युद्धात नागरिकाचं सहकार्य ही राज्यसरकारची सर्वात मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. कोणतंही युद्ध घाबरुन लढलं जात नाही आणि जिंकता तर येतच नाही. हे त्यांनी आपल्या संबोधनात वारंवार स्पष्ट केलं. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या जागतिक संकटाचा सामना करताना घाबरण्याचं कारण नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं.


पाहा व्हिडीओ : Uddhav thackeray on Coronavirus | शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करेल : उद्धव ठाकरे



या युद्धाचा सामना करण्यासाठी आपलं सरकार आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला. आपली यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे पुरेसे डॉक्टर्स, नर्स, व्हेन्टिलेटर्स, आयसीयू, सर्व प्रकारचं मनुष्यबळ एवढंच नाही तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना, राज्य सरकारने कोरोना विषाणूंच्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काय काय सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि राज्य सरकार काय काय करत आहे, याची माहिती दिली. राज्यातील जनतेला घाबरुन जाऊ नये असं आवाहन करतानाच हे राज्य शिवरायाच्या शूर मावळ्याचं असल्याची आठवण करुन दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या आवाहनात युद्धसदृश्य परिस्थिती कशी असते हे 1965 आणि 1971 च्या युद्धाचा संदर्भ देऊन सांगितलं.


सध्या कोरोना विषाणूंबरोबर सुरु असलेलं जागतिक युद्ध म्हणजे वॉर अगेन्स्ट व्हायरस आहे. या युद्धाचा भोंगा-सायरन वाजलेला आहे. या युद्धाच्या राज्य सरकारकडून ज्या ज्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत, त्याचं काटेकोर पालन करा. सीमेवर जसे आपले जवान एखादं युद्ध लढत असतात, तसंच आपले डॉक्टर्स आणि संपूर्ण वैद्यकीय फौज हे विषाणूंसोबतचं युद्ध लढत आहे. त्यात पोलीस आणि समाजसेवी संस्थाही मोलाचा वाटा उचलत आहेत. सरकारी आणि निमसरकारी यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी हा या विषाणूंसोबतच्या लढाईत एक सैनिक आहे.


मुंबईतील लोकल ट्रेन किंवा बेस्ट आणि राज्य परिवहन सेवेच्या बसमधून गर्दी करण्याचं आवाहन करताना ते म्हणाले, की प्रकासकीय यंत्रणेतला प्रत्येकजण लढत असताना आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, ऑफिसचं काम घरातून करता येणं शक्य असेल तर ते घरातूनच केलं पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडायचं शक्य होईल तेवढं टाळलं पाहिजे. आपण आपल्या घरात राहणं हे प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणेच्या युद्धासाठी मोलाचं सहकार्य आहे. ते आपल्यासाठी 24 तास जीवाचं रान करत असताना आपण घरात का राहू शकत नाही असा सवालही त्यांनी राज्यातील जनतेला केला.


Coronavirus | इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू; जगभरातील परिस्थिती गंभीर


राज्यातील सर्व धार्मिक आणि प्रार्थनास्थळे बंद झाल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जत्रा-यात्रा, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा-कार्यक्रम, आंदोलनं किंवा क्रीडा स्पर्धा सर्व काही स्थगित करणाऱ्या संघटनांचेही त्यांनी आभार मानले. एवढ्या उपायानंतरही अनावश्यक प्रवास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बस आणि ट्रेनची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली असतानाच आणखी ही गर्दी कमी करता येणं शक्य असल्याचं आवाहन त्यांनी केलं.


राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी फक्त 50 टक्के उपस्थिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. एकाच ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी या उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं.


कोरोना विषाणू एकेक पाऊल रोज पुढे टाकत आहे, प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे, यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसलं तरी आवश्यक ती काळजी-खबरदारी घेतलीच पाहिजे. आपल्याकडे आतापर्यंत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्यांची माहिती घेतली तर ते सर्व परदेशातून प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे अजून या विषाणूंच्या प्रादुर्भावाचं लोण पसरलेलं नाही. ही समाधानाची बाब आहे. परदेशातून भारतात आलेल्यांच्या संपर्कात आल्यामुळे फार कमी जणांना लागण झालेली आहे.


परदेशातून आलेल्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घेतली पाहिजे. त्यांनी तपासणी न होता, सर्वत्र वावरू नये असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या नकळत त्यांच्यामुळे हा विषाणू पसरू नये याची काळजीही घेतली पाहिजे. या विषाणूंची लागण झालेले अपराधी नाहीत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.कोरोना विषाणूंसोबतच्या लढाईत, केंद्र सरकारचंही पुरेपूर सहकार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. चाचणी करण्याच्या कीट वाढवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. एवढंच या नाही तर कोरोना विषाणूंच्या या जागतिक युद्धात पंतप्रधान मोदी आपल्यासोबतच असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.


शिवरायांचा महाराष्ट्र या जागतिक युद्धात कोरोना विषाणूंचा नक्कीच पराभूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


संबंधित बातम्या : 


भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद


Coronavirus | ममता बॅनर्जी यांच्या अधिकाऱ्याचा मुलगा कोरोनाबाधित; तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी