पालघर : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व जकात नाक्यावर प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची थर्मल उपकरणा द्वारे ताप तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पालघर जिल्ह्यांतून प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनातील नागरिकांची थर्मल उपकरणांद्वारे दापचरी येथील तपासणी नाक्यावर तपासणी केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी नव्या जीवरक्षक प्रणालीची खरेदी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगात येणाऱ्या सेवा क्षेत्रातील काही दुकानांना सुरू ठेवण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे.


नागरिकांना ‘कोरोना विषाणू’ची बाधा झालेली नसून जे ‘कोरोना विषाणू’बाधित देशातून प्रवास करून आले आहेत. त्यांच्याच करोना विषाणूची लक्षणे दिसायला 14 दिवस लागत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 14 दिवस घरात अलगीकरण करून राहावे लागणार आहे. अलगीकरण करणे सोपे नाही. इतरांच्या आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने त्यांना स्वत:ला घरात बंदिस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे आणि घरीच राहणे ही गोष्ट अभिमानास्पद आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे संशयित कोरोना रुग्ण म्हणून न पाहता त्यांना मदत आणि सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने स्पष्ट करण्यात आले आहे.ज्यांच्या हातावर अलगीकरण शिक्का असलेली व्यक्ती घराबाहेर फिरताना दिसली तर घाबरून वा गोंधळून न जाता अशा व्यक्तींना नम्रपणे घरी राहण्याची विनंती करा, असे आवाहन करण्यात आले आहे. तलासरी तालुक्यातील रबर इन्स्टिटय़ूटचे अतिथिगृह, दापचरी तपासणी नाका अतिथिगृह तसेच वेदांता रुग्णालयात अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. कांचन वनारे यांनी दिली.

उपाययोजना अशा..

परदेश प्रवास केलेल्या भारतीयांचे रिसॉर्टमध्ये अलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील वसई- विरार पालिका क्षेत्रातील 11 रिसॉर्ट निवडण्यात आली आहेत. याठिकाणी 488 नागरिकांची अलगीकरण करण्याची सुविधा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली.

परदेश प्रवास करून आलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांची संख्या २६३वर पोचली आहे. त्यापैकी ५० नागरिकांचा १४ दिवसातील देशातील वास्तव्य काळ संपला आहे. उर्वरित प्रवाशांपैकी १४ नागरिकांना करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्याने या सर्वाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी या सर्व चाचण्या नकारात्मक (निगेटिव्ह) आल्या आहेत.

रेल्वे स्थानक, बस स्थानकांत दर दोन ते तीन तासांनी स्वच्छता करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली आहे. एस.टी कर्मचारी तसेच रेल्वे आणि एसटी मधील सफाई कर्मचाऱ्यांनी दैनंदिन तपासणी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात केली जाईल.

पाणीपुरवठा, स्वच्छता विषयक सेवा, बँकिंग सेवा, दूरध्वनी व संचार सेवा, रेल्वे वाहतूक सेवा, अन्न, भाजीपाला व किराणामाल सेवा, दवाखाना, वैद्य्कीय केंद्र, औषधालय, वीज, पेट्रोलियम ऑईल, एनर्जी, प्रसारमाध्यम, बंदर व आवश्यक सेवेसाठी दिल्या आयटी सेवा सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

तर दुसरीकडे िल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला वाडा तालुक्यातील खुपरी येथील मुरली मनोहर या आलिशान हॉटेलच्या व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली असून 16 व 17 एप्रिल रोजी हैदराबाद वरून आलेल्या गेस्ट ना वास्तव्यास ठेवले. मात्र ही बाब स्थानिक सरपंच यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे संपर्क साधल्यावर स्थानिक वाडा पोलीस निरीक्षक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा पुरावे हाती आले तेव्हाही शासकीय यंत्रणेचा वरद हस्त असल्याचे समोर आले .एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या साध्या चिकन विक्रेत्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येतात तर दुसरीकडे आलिशान हॉटेल मालकांना अभय देण्याचे काम केले जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे .त्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योग्य कार्यवाही करते का असं केस प्रश्नचिन्ह जनतेसमोर उभा राहिल आहे.