बीड : कोरोना व्हायरससंदर्भात राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याला काही लोकं चांगला प्रतिसाद देत आहेत तर काहीजण या स्थितीत देखील नियम मोडत आहेत. बीडमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेला यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, आई वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडीची हवा खावी लागली. ही घटना बीड जिल्हयातील माजलगाव शहरात जवळील ब्रम्हगाव येथे घडली. गाजावाजा करून धूमधडाक्यात लग्न करण्याचा हट्ट या मंडळींना नडला असून कायदा मोडला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव शहरापासून एक किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100 ते 125 लोकं जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उद्घोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यावेळी पोलिसांच्या सूचना डावलत त्यांच्या आदेशाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. यानंतर 5 ते 6 नातेवाईकांनी लग्न उरकून घेतले.


Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे  

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली असून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 12 तासात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लंडनमधून आलेली मुंबईतील महिला आणि दुबईहून परतलेले अहमदनगरमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


49 पैकी 40 कोरोनाबाधित हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असलं तरी याचा धोका वाढला आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या सूचनाचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असंही राजेश टोपे म्हणाले. आज आपण फेज 2 मध्ये आहोत, 3 मध्ये आपल्याला जायचं नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. तिथे संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. ट्रेन बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असं टोपे यांनी सांगितलं. तसंच एसटी बसमध्ये 50 ऐवजी 25 प्रवासी बसवले जाणार असून एका सीटवर एकच व्यक्ती असेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या
पुणे - 19
मुंबई - 11
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड - 1
ठाणे - 1
अहमदनगर - 2
औरंगाबाद - 1
रत्नागिरी- 1