मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली असून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 12 तासात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लंडनमधून आलेली मुंबईतील महिला आणि दुबईहून परतलेले अहमदनगरमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


49 पैकी 40 कोरोनाबाधित हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असलं तरी याचा धोका वाढला आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या सूचनाचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असंही राजेश टोपे म्हणाले. आज आपण फेज 2 मध्ये आहोत, 3 मध्ये आपल्याला जायचं नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. तिथे संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. ट्रेन बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असं टोपे यांनी सांगितलं. तसंच एसटी बसमध्ये 50 ऐवजी 25 प्रवासी बसवले जाणार असून एका सीटवर एकच व्यक्ती असेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या
पुणे - 19
मुंबई - 11
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड - 1
ठाणे - 1
अहमदनगर - 2
औरंगाबाद - 1
रत्नागिरी- 1

विमानतळावर आज 12 देशांमधील विमानांना बंदी घातली आहे. त्यामुळे काही  जण या १२ व्यतिरिक्त देशांमधून विमानातून भारतात येत आहे. या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची नुसती तपासणी करुन सोडून दिलं जातं. पण यामुळे नुकसाना होऊ शकतं. हा मुद्दा मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना सांगितला. त्यांनाही तो पडला. मी आज विमानतळावर जाऊन पाहणी करणार आहे. येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री घेणार आहे, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं.

तसंच कोरोनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची संवाद साधणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

Coronavirus | कोरोना व्हायरस | मुंबईतील लोकल ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय : राजेश टोपे | ABP Majha