बुलडाणा : बुलडाण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर 24 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन' सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 6 ते 7 सेकंद उभे राहिल्यास संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण होतं. बंदोबस्तावरील पोलिसांसाठी अशा प्रकारची सुविधा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बुलडाणा जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज (8 एप्रिल) अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.


बुलडाणा पोलीस मोटार परिवहन विभागातील 'फोर्स मोटर्स लाईट व्हॅन' या वाहनाचा उपयोग संबंधित सुविधेसाठी करण्यात आला आहे. या वाहनामध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टम बसवण्यात आली असून वाहनाच्या टपावर 750 लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर या कामासाठी करण्यात आला आहे. या टाकीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून पाईपद्वारे गाडीच्या आतील भागात सोडण्यात आले आहे. ही मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणासाठी फिरणार आहे.


दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात आज कोरोनाच्या दोन नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 11 वर पोहोचला आहे. या अकरा जणांमध्ये दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.