मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच लॉकडाऊन 5 मध्ये अनेक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्याने शिथील केला जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं निश्चित झाल्याच्या अफवा पसरत होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असं स्पष्टिकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्वीट :
सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये, 'लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.' असं नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले होते की, 'परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल.' त्यांच्या या वक्तव्यामुळे लॉकडाऊन पुन्हा कठोर होणार असल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. त्यामुळे या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करत स्पष्टिकरण देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ : गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, 'कोरोनाविरुद्धचा लढा आपला संपलेला नाही तो सुरुच आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत. कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहे. मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्याच आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
...तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 3 ऑगस्टपासून, मुख्यमंत्र्यांची माहिती
शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे : मुख्यमंत्री