मुंबई : खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पाहा. तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार आली नाही पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तूर व धान खरेदी बाबत आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते.


खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती, त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचं संरक्षित साठा करण्यात येत आहे.


पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे


खते व बी बियाणे बांधावर पुरवण्यासाठी 47 हजार 89 शेतकरी गट तयार करण्यात आले असून 1 लाख 55 हजार 755 मेट्रिक टन खत, 86 हजार 126 मेट्रिक टन बियाणे , 1 लाख 80 हजार 481 कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण 5 लाख 27 हजार 483 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.


पिक कर्ज वाटपाला गती द्यावी


कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या असून बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी माहिती दिली की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पिक कर्ज वाटप झालं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा 22 मे रोजीचा शासन निर्णय पोहोचवणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये, अशा सूचना दिल्याचं त्या म्हणाल्या.


कापूस, तूर खरेदी

एकंदर 381 लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाला असून 9 लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून २2 लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. 822 कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18.90 लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील.