सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील चार कष्टकरी गरीब कुटुंबावर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकल्याची तक्रार या कुटुंबांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन आणि अंनिसला (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) दिली आहे.  या कुटुंबाशी कोणी संबंध ठेवल्यास त्याला 5 हजाराचा दंड ठोठावला जाईल, असा फतवा  देखील पंचांनी काढला असल्याचे या कुटुंबाने तक्रारीत म्हटले आहे.
 
कवठेमहांकाळ येथील काळे प्लॉटमध्ये नंदीवाले समाज आहे. या ठिकाणी यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण यांचेसह 4 कुटुंबांना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे. तर या कुटुंबाशी कोणी संबंध ठेवल्यास 5 हजाराचा दंड ठोठावला जाईल, असा फतवा पंचानी मिटींग घेऊन काढला आहे. तर पीडितांच्या मुला-मुलींची लग्ने पंच मोडत आहेत. जर मयत झाले तर कोणी मदतीला येत नाही. या कुटूंबातील लोकांना रोजगाराला सुद्धा बोलवलं जात नाही. समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलवलं जात नाही. तर पंच पीडितांना वारंवार दमदाटी करतात, अशा प्रकारचा बहिष्कार अनेक दिवस सुरू असल्याची कुटुंबांची तक्रार आहे.




पीडित कुटुंबांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला आहे. तसेच कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला काल तक्रार अर्ज दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कुटुंबाच्या मदतीला धावून आली आहे. अंनिसच्या वतीने पोलीस व प्रशासनला आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नव्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार  कोणत्याही कारणाने एखाद्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे पीडितांच्या तक्रारीची लवकर सखोल चौकशी करून पंचावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी अंनिसने केली आहे.