रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक सण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. अगदी गणेशोत्सवावरही कोरोनामुळे झालेला परिणाम सर्वांना माहितच आहे. पण, आता चार दिवसांवर आलेल्या श्रावणी सोमवारवर देखील कोरोनाचा परिणाम दिसून येणार आहे. श्रावणातील सोमवार म्हटलं की, भाविक मोठ्या प्रमाणात शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पण, यंदा मात्र भाविकांना त्याठिकाणी जाता येणार नाही आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान. महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पण, यंदा मात्र भाविकांना या ठिकाणी येता येणार नाही. कोरोनामुळे देशातील देवस्थाने बंद आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे देवस्थान भक्तांसाठी बंद आहे. या ठिकाणी दररोज शंभू महादेवाची पूजा आणि आरती मात्र नित्य होत आहे. पण, भाविकांची होणारी गर्दी मात्र थांबली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यास याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुलं करता येणार नसल्याची माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी दिली आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या दुकानदारांवर देखील कोरोनाचा परिणाम होताना दिसत आहे.



काय होतोय परिणाम?
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधील मारळ या गावी मार्लेश्वर हे देवस्थान येते. दररोज या ठिकाणी हजारो भाविक येतात. पण, श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे देवस्थान भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास शंभर दुकाने आहेत. त्या ठिकाणी प्रसाद, ओटी, नारळ, हार-फुले शिवाय जेवणाची सोय केली जाते. पण, यंदा मात्र हे सारे ठप्प आहे. वर्षाच्या इतर दिवसांची तुलना करता श्रावण महिन्यातील या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यावरच इथला रोजगार आणि उलाढाल अवलंबून असते. पण, यंदा मात्र सारे ठप्प आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सध्या दुकाने बंद आहेत. आतापर्यंत आम्ही कसेबसे दिवस काढले. शेती केली. या दुकानांवरच आमचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. पण, आता मात्र यापुढे अवघड होणार आहे. किती काळ आणखी जाईल माहित नाही. दुकानं बंद असल्यामुळे आम्हाला आता मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेकडो जण काम करत आपलं पोट भरतात. पण, आता काय करायचे? हा प्रश्व आम्हाला सतावत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणचे दुकानदार रुपेश सावंत यांनी 'एबीपी माझा'कडे व्यक्त केली.


निसर्ग रम्य वातावरण





मार्लेश्वरचे नैसर्गिक वातावरणही तितकंच नयनरम्य आहे. पावसाळ्यात ते आणखी खुलून जाते. उंचच उंच डोंगरांवरुन कोसळणारे फेसाळलेले धबधबे, हिरवाईने नटलेला परिसर आणि मोराचा केका हे सारं मन प्रसन्न करुन सोडते. भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाप या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना पाहायला आणि अनुभवता येतो. पण, यंदा कोरोनामुळे मात्र येथे येणारी भाविक निराश असून शंभूदेवाच्या भेटीसाठी आतुर असल्याची प्रतिक्रिया इथल्या पुजाऱ्यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे. पण सरकारी आणि प्रशासकीय निर्णय होईपर्यंत भक्तांना वाट मात्र पाहावी लागणार आहे.