पालघर : उर्दू गजल गायनातील एक मराठी माणूस मदन काजळे यांच्यावर या कोरोनाकाळात 90 वर्षाच्या आईसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. विदर्भातून आलेले मदनजी मराठी भाषिक असूनही उत्कृष्ट उर्दू गजल गातात. उर्दूत गजलमध्ये मराठीचा डंका मिरवणा-या या गजलकाराला सद्या कोरोनाने अक्षरशः रस्त्यावर आणून सोडले आहे. 


जिंदगी तूने लहू लेके दिया कुछ भी नहीं
तेरे दामन में मेरे वासते क्या कुछ भी नहीं
मेरे इन हाथों की चाहो तो तलाशी ले लो
मेरे हाथों में लकीरों के सिवा कुछ भी नहीं


शायर राजेश रेड्डी यांनी हे लिहिलेली गजल संगीतबद्ध करुन मदनजी काजळे यांनी गायली आहे. त्यांच्या या गायनात दर्द तर आहेच पण त्यांच्या जीवनातील वास्तवताही आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्हयातून धोञागणेशपूर या छोट्याशा खेडयातून गरिबीतून आलेले मदनजींनी लहानपणापासूनच संघर्ष केला. लहानपणापासून संगीताची आवड असल्याने, संगीत क्षेञात शिक्षण घेतल्यावर नशीब आजमवण्यासाठी 2000 साली ते मुंबईत आले. तेथे त्यांनी कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये तीन वर्ष संगीत शिक्षकाची नोकरी केली. माञ गळ्याला ञास होत असल्याने त्यांनी ही नोकरी सोडली आणि उपजिवेकेसाठी राज्यभर गजलाचे कार्यक्रम करु लागले. 


सुरेश वाडकर, देवकी पंडित यांच्यासोबत देखील काम केले आहे. तसेच जीवनगौरवपुरस्कार सन्मानित श्रीकृष्ण राऊत यांच्या रचना देखील त्यांनी गायल्या आहेत. 2010 साली त्यांना सुरेश भट स्मृती पुरस्कार ही मिळाला आहे. मेहंदी हसन, मन्ना डे, मोहम्मद रफी, किशोर कुमार, उदित नारायण, रुपकुमार राठोड यांच्यासह अनेक गीतकारांची गाणी ते आपल्या आवाजात सादर करतात.


मदनजी आपल्या 90 वर्षाची आई गोदावरी काजळेसह मीरा भाईंदर मध्ये राहण्यास आले. 15 वर्ष वास्तव केल्यावर भाडे जास्त असल्याने ते वसईच्या निर्मळ येथे कमी किमतीत भाड्याने राहण्यास आले. मात्र कोरोना काळात गजलचे कार्यक्रम बंद झाले आणि त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. भाडे न देवू शकल्याने त्यांना रस्त्यावर आई सोबत 15 दिवसापासून राहवं लागलं. शेवटी तेथील समाजसेवकांनी त्यांना वसईच्या तुंगारेश्वर येथील महापालिकेच्या निवारा केंद्रात आसरा देऊन भरपूर मदतही केली. महापालिकेने निवारा केंद्रात आसरा दिला असला तरी मदनजींना त्यांच्या कलेची अजूनही जाण आहे. मला माझी माझी कला जिवंत ठेवायची आहे, असा निश्चय त्यांनी केला आहे. 


संबंधित बातम्या :


BLOG | कलेची श्रीमंती आज ओक्साबोक्सी रडली...


आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांना माझा कट्ट्यावर अश्रू अनावर