मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकिकडे मुख्यमंत्री आयपीएलपासून अनेक कार्यक्रमांचा आढावा घेत आहेत त्याचवेळी दुसरीकडे या व्हायरसचा ताण सांगलीत होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावरही आला आहे. अर्थात याबद्दल कोणतीही अधिकृत सूचना वजा आदेश मध्यवर्ती शाखेला मिळालेले नाहीत. पण सांगलीतल्या आयोजकांची मात्र गोची झाली आहे. याला कोणी एक जबाबदार नसून उद्भवलेली स्थिती दुर्दैवी असल्याची चर्चा संमेलन नगरीत आहे.


नाट्यसंमेलनाबाबत मंगळवारी जयंत पाटील यांनी आयोजकांची बैठक घेतली. त्यावेळी हे संमेलन यशस्वी करण्यावर चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांना आणि नाट्यकर्मींना कामाला लागण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या आहेत. राजकीय स्तरावर उत्साहाचं वातावरण असलं तरी प्रशासकीय पातळीवर मात्र हे संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. याबाबत सोमवारी (9 मार्च) सांगलीच्या आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी एकूण कोरोनाचा धोका लक्षात घेता हे संमेलन पुढे ढकलावं असा तोंडी पर्याय दिला आहे. जोवर लेखी काही येत नाही तोवर काय करावं यावर आयोजक हवालदिल झाले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर सांगली शाखेतील एक अधिकारी म्हणाला, 'कोरोनाचा धोका वाढतो आहे. आता पुण्यातही रूग्ण सापडले आहेत. अशावेळी सातारा आणि भागातल्या यात्रा, जत्रा रद्द करण्याच्या सूचना आल्या आहेत. तशा त्या लेखी सूचना आहेत. तरीही गर्दीचे कार्यक्रम करायचे तर आपआपल्या जबाबदारीवर करा यात प्रशासन जबाबदार असणार नाही असा आशय आहे. सांगलीत मात्र असं पत्र काढलेलं नाही. संमेलन करावं का नाही याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय 25 मार्चला निर्णय देतील असं सांगितलं जातं. संमेलन 27 मार्च पासून आहे. जर ते 25 मार्चला रद्द केलं तर मंडपापासून सर्व खर्चं मध्यवर्ती आणि सांगली शाखा करेल तो वाया जाईल. शिवाय प्रशासनाने हिरवा कंदिल जरी दिला तरी कोरोना आटोक्यात नाही आला तर लोक येतील का, कलाकार येतील का असा सवालही आम्हाला भेडसावतो आहे.'


Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा


संमेलन जंगी करण्याचा चंग सांगली आणि मुंबई मध्यवर्ती शाखेने बांधला आहे. जे स्तुत्य आहेच. पण कोरोनाचा धोका वाढला तर काय याबाबत सध्या विचार सुरू आहे. संमेलन पुढे ढकललं तर सांगलीसह इतर सगळी गावागावात होणारी साखळी संमेलनं पुढे ढकलावी लागणार आहेत. याबाबत बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून संमेलन होणार असंही सांगितलं जातंय. पण तसे स्पष्ट निर्देश सांगली शाखा आणि मध्यवर्ती शाखेला अद्याप देण्यात आलेले नाहीत. संमेलन आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नियोजित नाट्यपंढरीत जवळपास 50 हजार फुटांचा मंडप उभारायचा आहे. तो उभारण्यासाठी किमान 15 दिवस लागतात. आज उद्याच हा निर्णय झाला तर हे काम तातडीने सुरू होऊ शकणार आहे. कोरोनाच्या या संसर्गाने ही दुर्दैवी कात्री तयार केल्याची भावना नाट्यवर्तुळात निर्माण झाली आहे.




'तशा' अधिकृत सूचना नाहीत
याबाबत नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रवक्ते मंगेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप आम्हाला तशा कोणत्याही सूचना मिळालेल्या नसून, आम्ही एकूणच परिषदेचे विश्वस्त शरद पवार, सर्वं शासकीय, प्रशासकीय यंत्रणा आदींशी बोलून निर्णय घेऊ, असं सांगितलं.


उरूसही रद्द करण्याचा पर्याय?
मिरजमध्ये दरवर्षी मुस्लीम बांधवांचा उरूस भरतो. भारतभरातून हजारो मुस्लीम बांधव या उरूसात सामील होतात. हा उरूसही पुढे ढकलावा किंवा यावेळी रद्द करावा असा पर्याय प्रशासनाने दिल्याचं कळतं. अर्थात याला अधिकृत दुजोरा नाही. कोरोना संबंधात ज्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या बैठका घेतल्या गेल्या त्यात हे विचार मांडण्यात आले आहेत. उरूसाबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.


Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल


Coronavirus | कोरोनाच्या भीतीने औरंगाबादमधील शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही