मुंबई : मध्य प्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करुन मोठा निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मध्य प्रदेशात सत्तांतर निश्चित होणार असून काँग्रेस सरकार जाऊन भाजपचे सरकार तेथे स्थापन होणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात केला तसा राजकीय भूकंप महाराष्ट्रात लवकरच होईल, असा दावाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.


ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल एनडीएतर्फे आपण त्यांचे अभिनंदन करत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं. ज्योतिरादित्य शिंदे हे मूळचे महाराष्ट्राचे असून मराठी भाषिक आहेत. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी देखील याआधी भाजप पक्षात होत्या. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपवर टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपने कोणत्याच प्रकारची फोडाफोड केली नसल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले.


MP Political Crisis | शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-भाजपची आमदार वाचवा मोहीम


मध्य प्रदेशात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. मात्र असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात बंडखोरी होईल, असं भाकीत आठवले यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा खुलासा देखील आठवले यांनी यावेळी केला.


Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश


काँग्रेसला रामराम करुन ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर आज (11 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमळ हाती घेतलं. गेल्या 18 वर्षात श्रद्धेने कार्य केलं. काँग्रेस सोडताना मन दु:खी आहे, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्त्वाला मान्यता मिळत नाही, असा आरोपही ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला.