Coronavirus In Maharashtra :  देशभरात कोविडबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या  JN.1 मुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात आज 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर,  JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. आज दिवसभरात राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक 19 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 


राज्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 14 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. हे रुग्ण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे. 


JN.1 व्हेरिएंटची स्थिती काय?


सध्या राज्यात JN.1 व्हेरिएंटची एकूण रुग्णसंख्या ही 10 वर पोहचली आहे. यापैकी 8 पुरुष आणि एक महिला रुग्ण आहे. या 9 रुग्णाांपैकी एक रुग्ण 9 वर्षाचा मुलगा, एक रुग्ण 21 वर्षाची महिला, एक रुग्ण २८ वर्षाचा पुरुष आणि उर्वरित सर्व रुग्ण हे 40 वर्षावरील आहेत. यापैकी 8 रुग्णांनी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतले होते. पुण्यात आढळलेला रुग्ण हा अमेरिकेतून प्रवास करून आला आहे. या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या रुग्णांना सौम्य लक्षणे होती आणि रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 


देशात JN.1 व्हेरिएंटच्या रुग्ण संख्येत वाढ 


भारतातील कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 फैलावत (Coronavirus Varient JN.1) असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची 22 प्रकरणे होती, त्यांची संख्या आता 110 वर पोहचली आहे.  कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित केरळ मध्ये आढळला होता. पण सध्या गुजरात आणि कर्नाटकात याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. बुधवार, 27 डिसेंबरपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, JN1 चे एकूण 110 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये या दोन राज्यांमधून सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारही याबाबत सतर्क झाले आहे. राजधानी दिल्लीतही JN.1 व्हेरिएंटच्या पहिल्या बाधिताची नोंद करण्यात आली आहे. 


JN.1 व्हेरिएंट काय आहे?


JN.1 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आढळून आला. हा ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2.86 ने तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला  BA.2.86 व्हेरिएंट कोरोनाबाधितांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरला होता.  BA.2.86 व्यापकपणे फैलावला नव्हता. मात्र, तज्ज्ञांनी या व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली होती.  BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनवर अतिरिक्त म्युटेशन झाले होते. त्याच प्रकारे JN.1 स्पाइक प्रोटीनवरही एक अतिरिक्त म्युटेशन आहे. 


जागतिक स्तरावर केसेसमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की JN.1 – Omicron चे उप-प्रकार – मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएस मध्ये सर्वात वेगाने फैलावणारा व्हेरिएंट म्हटले आहे.