जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि बाधितांचा मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे असं चित्र असताना पाचोरा तालुक्यातील सर्वच यंत्रणांनी उत्तम समन्वय साधत कोरोनाच्या बधितांवर उपचार यंत्रणा राबवल्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सात महिन्याच्या बाळापासून 94 वर्षांच्या आजी कोरोनामुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1100 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 118 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्याच्या या आकडेवारीमध्ये पाचोरा भडगाव तालुक्यातील 84 जणांना लागण झाली आहे. तर यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही तालुक्यात कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात याठिकाणच्या यंत्रणांना चांगलेच यश मिळालं आहे. याचा परिणाम म्हणून भडगाव शहरातील कासार गल्लीत राहणाऱ्या इंदूबाई कासार यांच्या कुटुंबातील सात जण कोरोनामुक्त झाले आहेत.
विशेष म्हणजे सात महिन्यांच्या बाळापासून ते 94 वर्षांच्या इंदूबाई कासार या कोरोनापासून मुक्त झाल्याने कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांच्या काळात या सकारात्मक बातमीने जिल्ह्याला चांगला दिलासा मिळाला आहे. याठिकाणी प्रशासन अधिकारी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा चांगला समन्वय असल्याने हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनामुक्त झालेल्या परिवारातील सदस्यांचं आमदार किशोर पाटील यांनी साडीचोळीचा आहेर आणि कपडे देऊन स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीने केलेल्या या अनोख्या आदरतीथ्याने कासार कुटुंबाला आपल्या भावना आवरणे कठीण झालं होतं.