चंद्रपूर : लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण... ही म्हण चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अगदी तंतोतंत लागू होत आहे. कारण ज्या कोरोना नियंत्रण कक्षातून नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक आदेश जारी होतात, त्याच नियंत्रण कक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला. कोरोना काळात शारीरिक अंतर पाळा, तोंडाला मास्क लावा, आवश्यक तेवढेच सण उत्सव कार्यक्रम साजरे करा, अशा पद्धतीच्या रोजचा सूचनांचा रतीब याच कार्यालयातून जारी होतो.


मात्र या सर्व सूचना केवळ नागरिकांसाठीच आहेत, अधिकाऱ्यांसाठी नाही, असा समज झालेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चक्क नियंत्रण कक्षातच डॉ. गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. केक कापून आणि सर्वांना भरवून आनंद साजरा केला. गहलोत यांच्या लग्नाच्या वाढदिवसात तमाम आरोग्य अधिकारी सहभागी झाले. हे सर्व वाढदिवसाचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.


जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कक्षाच्या 100 पावले अंतरावर असलेल्या या नियंत्रण कक्षातच अधिकाऱ्यांकडून सूचनांची पायमल्ली झालेली दिसली. अगदी गाव पातळीपर्यंत नियमांचे पालन झाले पाहिजे, यासाठीची यंत्रणा इथूनच कार्यान्वित होते. मात्र डॉ. गेहलोत आणि इतर अधिकाऱ्यांनी आमचे कोण काय बिघडवते? असा समज करून घेतल्याचे दिसले. नियंत्रण कक्षात साजरा केलेल्या वाढदिवसाने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाची मात्र नाचक्की झाली आहे.


या व्हायरल फोटोबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गेहलोत यांनी लग्नाचा वाढदिवस नियंत्रण कक्षात साजरा झाला याला दुजोरा दिला. कल्पना नसताना सहकाऱ्यांनी केक आणला आणि कापायला लावला, अशी लंगडी सबब देत गेहलोत यांनी सेलिब्रेशन आधी सर्वांना सॅनिटाईज केले गेले अशी खबरदारीयुक्त पुस्तीही जोडली आहे.


Coronavirus | गेल्या 24 तासांत एकही पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही