रत्नागिरी : आठवड्याभरापूर्वी रत्नागिरी जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत होता. त्यामुळे जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण, कोरोनामुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करणारा रत्नागिरी जिल्हा आता कोरोनायुक्त जिल्हा म्हणून पुढे येताना दिसत आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील 11 तर खेडमधील कळंबणी येथील दोन जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

साधारण 15 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून सहा महिन्याच्या बाळासह आणखी दोन जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र होते. पण, आठवडाभरापासून मात्र जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण आढळू लागले. दरम्यान, मागच्या आठवडाभरात तब्बल 28 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सारे जण 'मुंबई रिटर्न' आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही आता 34 वर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी पाच जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. तर, खेड येथील एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. या व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले होते. सध्या जिल्ह्याचा विचार करता मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये एकही कोरोनाचा रूग्ण सापडलेला नाही.

मुंबईहून आल्यानंतर क्वारंटाईन

कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईहून येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. पास अथवा परवानगी न मिळाल्यास लपून-छपून देखील सध्या चाकरमानी आपल्या गावी दाखल होत आहेत. गावी आल्यानंतर त्यांना लगेचच क्वारंटाईन करून ठेवले जात आहे. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीकरता पाठवले जात आहेत. दरम्यान, रत्नागिरीमधील स्थानिक किंवा अडकून पडलेल्यांच्या तुलनेत मुंबईहून आलेल्यांचे कोरोना रिपोर्ट हे जास्त संख्येने पॉझिटीव्ह येत असल्याचे दिसत आहे.

चाकरमान्यांना गावी आणण्याबाबत उलटसुलट सूर

कोकणातील मोठा वर्ग सध्या मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त वास्तव्य करत आहेत. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून चाकरमान्यांना गावी आणण्याची मागणी काही राजकीय नेते किंवा स्थानिक नागरिक देखील करत आहेत. पण, चाकरमान्यांना होणारी कोरोनाची लागण हा चिंतेचा विषय ठरत असून त्याबाबत मात्र आता उलटसूलट सूर पाहायाला मिळत आहे.

चाकरमान्यांना आणल्यास वैद्यकीय तयारी आहे का?

सध्या जिल्ह्यात देखील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ हे कमी आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर देखील ताण आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गावी आणल्यास त्यांना ठेवणार कुठे? त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्याइतपत जिल्ह्याची वैद्यकीय तयारी आहे का? असा सवाल देखील केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात चाकरमानी आल्यास ग्रामीण भागात 12 हजार ठिकाणे निश्चित करण्यात आली असून 73 हजार लोक राहू शकतात अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

'विरोधापेक्षा वास्तव नाकारता येत नाही'

चाकरमान्यांना गावी आणण्यास किंवा त्यांना येण्यास आमचा विरोध नाही. पण, त्यांना गावी आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी कशी करणार? त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांची तयारी आहे का? असा सवाल देखील स्थानिक करत आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा : अनिल परब
Lockdown 3.0 | येत्या सोमवारपासून एसटीची मोफत सेवा मिळणार, प्रत्येकाने खाण्यापिण्याचं सामान सोबत ठेवावं - अनिल परब