नांदेड : न्यायाधीश म्हणजे केवळ न्यायालयात बसून न्यायदानाचे कार्य करणे, असा आपला समाज आहे. पण या कोरोना विषाणूच्या काळात एका वरिष्ठ न्यायाधीशाने हा समाज खोटा ठरवत लोकांची काळजी घेण्यासाठी चक्क रस्त्यावर उतरल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं पाहायला मिळाले. नांदेड जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. जिल्ह्यात 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 40 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने सर्व कोरोनाबाधित हे नांदेड शहरात आहेत. त्यामुळे अजून ग्रामीण भाग सुरक्षित असल्याचं चित्र आजतरी आहे. प्रशासन ग्रामीण असो की शहरी भाग सर्वत्र कोरोना संदर्भात जमजागृती करण्याचा प्रयत्न करतेय. पण काही मंडळी तरीही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हे चित्र पाहून भोकर न्यायालयाचे वरिष्ठ सत्र न्यायाधीश मुजीब शेख स्वतः लोकांच्या सुरक्षेसाठी इरस्त्यावर उतरले आहेत.
न्यायाधीशांनी एका ऑटोरिक्षात ध्वनिक्षेपक लावून संपूर्ण भोकर शहरात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं. याशिवाय भोकर शहरातील विविध चौकात जाऊन त्यांनी याच ध्वनिक्षेपकावरून जनजागृतीपर भाषणही केलं. एरव्ही न्यायाधीश नेहमीच आपल्याला न्यायदालनात बसून आपलं करताना आपल्याला दिसतात. पण कोरोनाच्या संकटकाळात न्यायाधीशांनीही जनजागृतीचे काम केल्याचे हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.


कायद्याच्या माध्यमातून लोकांना मदत
सत्र न्यायाधीसह मुजीब शेख हे कायमच लोकांसाठी कायद्याच्या माध्यमातून काम करताना अनेकांनी पाहिले आहे. न्यायाधीश शेख यांनी आजवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना मुंबई, पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयात कायद्याच्या आधारे मोफत उपचार करून दिलेले आहेत. ज्या सामान्य लोकांना शासकीय कार्यालयात विविध दाखले मिळवण्यासाठी त्रास होतो. त्या सर्वांसाठी न्यायालयात प्रशासकीय यंत्रणेला बोलवून कायद्याच्या आधारे खात्री करून विविध प्रमाणपत्रे वाटली आहेत. जोडप्यांमधील वाद सामंजस्याने मिटवून शेकडो संसार पुनर्स्थापित केले आहेत.

सामाजिक कार्यात पुढाकार
विधी सेवेसोबत विविध सामाजिक कार्यातही वैशिष्ट्यपूर्ण काम करून वेगळी ओळख न्यायाधीश मुजीब शेख यांनी निर्माण केली आहे. लॉकडाऊन काळात अडकून पडलेल्या अनेक मजूर कुटुंबाना दिलासा देण्यासाठी विधी सेवा समितीच्या माध्यामातून पुढाकार घेत श्री रेणुकादेवी संस्थान माहूर यांच्या मार्फत अन्नधान्य वाटप केले आहे. पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप देखील न्यायाधीश महोदयांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. न्यायाधीश मुजीब शेख यांच्या या उपक्रमाला अन्य सहकारी न्यायाधीश आणि वकील मंडळींनीही समर्थन दिलंय.

Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट