Maharashtra Corona Vaccine : महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली असून आतापर्यंत 10 कोटी लसींचा टप्पा ओलांडला आहे. देशातील लसीकरणाची स्थिती लक्षात घेता  हा एक प्रकारचा विक्रम केला आहे.  उत्तप्रदेशनंतर 10  कोटींचं लक्ष्य गाठणारं दुसरं राज्य आहे. तर मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे. 


आतापर्यंत  राज्यात एकूण 6 कोटी 80 लाख 53 हजार 77 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 3 कोटी 20 लाख 74 हजार 504 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.  मुंबईत सर्वाधिक 1 कोटी 49 लाख 92 हजार 825  डोस तर पुण्यात 1 कोटी 22 लाख 33 हजार 340 डोस दिले गेले. त्या खालोखाल ठाणे (84,37,825), नाशिक (48,76,948), नागपूर (45,54,264) चा क्रमांक लागतो.



मुंबईत 279 कोरोना रुग्णांची नोंद


 कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठं यश आलंय. कोरोनाच्या महामारीच्या काळात मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरं जावा लागलं होतं. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळतंय. यातच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तिनशेहून कमी रुग्णांची नोंद झालीय. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचलाय. तर, आज केवळ एकाच व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमवलाय. 



पुण्यात गेल्या 24 तासात 113 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुण्यात गेल्या 24 तासात 47 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 57 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495082 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 647 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3695 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.


 नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार


 शहरात एक डिसेंबरपासून कोविड लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस पैसे देऊन मिळणार. नागपूर शहरात अजूनही दोन लाख 70 हजार नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. याच लोकांमुळे कोरोनाची साथ पुन्हा पसरणार नाही ना अशी पालिकेला भीती वाटत आहे.