मुंबई : येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्यात एक ऑनलाईन बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यातील 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण कशा पद्धतीने करण्यात येऊ शकेल यावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 


आतापर्यंत राज्यातील 1.2 कोटी नागरिकांना कोरोनाच्या लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तसेच जवळपास 15 लाख नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.  एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट राज्याला कशा प्रकारे लस पुरवठा करणार यावर मुख्यमंत्री आणि अदर पुनावाला यांच्यात चर्चा झाली आहे. यावेळी कोरोना लसीच्या किंमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. 


येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात राबवण्यात येणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमावर बैठक घेणार असल्याचंही या ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. देशातील 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून  महाराष्ट्र सरकारने  या निर्णयाचे स्वागत केलं आहे. राज्यात आता व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 


सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपयांना तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी सांगिंतलं की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील. 


महत्वाच्या बातम्या :