लातूर : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील वीज मंगळवारी (20 एप्रिल) रात्री गेली. त्यातच तेथे असलेले जनरेटर सुरु झाले नाही. त्याचा परिणाम येथे आयसीयूमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामु्ळे पुढे अनुचित प्रकार घडू नये म्हणून या रुग्णांना तातडीने संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु असलेल्या सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याला संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.


लातूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यापासून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात मंगळवारी रात्री अचानक वीज गेली. लाईट गेल्यानंतर तेथील जनरेटरची स्वयंचलित यंत्रणा तातडीने सुरु होणे आवश्यक होते. पण ती यंत्रणा बंदच राहिली, अर्धा-पाऊण तास लाईट येत नसल्याचे लक्षात आले. तोपर्यंत आयसीयूमधील कोविडचे रुग्ण अस्वस्थ होऊ लागले. त्यानंतर मध्यरात्री महाविद्यालयाची यंत्रणा हलली. या रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरील गंभीर रुग्णांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मध्यरात्री हा खेळ सुरु होता. तेथे नेऊन तातडीने या रुग्णांची व्यवस्था करुन तेथे उपचार सुरु करण्यात आले. या रुग्णांना त्वरित हलवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.


याविषयी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले म्हणाले की, "सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मंगळवारी रात्री वीज गेली होती. तेथील स्वंयचलित यंत्रणा सुरु होऊ शकली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने तेथील काही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. 


कोट्यवधी रुपये खर्च करुन या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली होती. कोविड संसर्ग लक्षात घेऊन ते सुरु करण्यात आले. येथील सगळी यंत्रणा अद्यावत आणि नवीन आहे. असे असताना वीज गेल्यावर असणारी यंत्रणा चालूच झाली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. काही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती प्रशासन देत आहे. मात्र दिवसभर अनेक चर्चांना उधाण आले होते. वेळोवेळी त्याबाबत माहिती विचारण्यात आल्यावर प्रशासनाकडून रात्री काय झाले ते सांगण्यात आले.