मुंबई : कोरोना विषाणूवर मोठा गाजावाजा करत शनिवारी (16 जानेवारी) लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी कोविन अॅपमध्ये अडचणी आल्याने लसीकरणाला दोन दिवस स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता अॅपमध्ये सुधारणा करण्यात आल्याने मुंबईत लसीकरणाला आजपासून (19 जानेवारी) सुरुवात केली जाणार आहे.


आठवड्यातून चार दिवसात लसीकरण केले जाणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी लसीकरण पार पडणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.


असे होणार लसीकरण 


कोविन अॅपमध्ये सुधारणा करण्यासाठी रविवार (17 जानेवारी) आणि सोमवार (18 जानेवारी) या दोन दिवशी लसीकरणाला स्थगिती दिली होती. अॅपमध्ये सुधारणा झाल्याने आजपासून पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे. आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जाणार असून महापालिकेच्या 9 केंद्रावरील 40 बूथवर दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर 500 लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. कोविन अॅपवरुन लाभार्थ्यांना मोबाईलवर संदेश जाणार असले तरी पालिकेकडूनही लाभार्थ्यांना संदेश पाठवले जाणार आहेत. लसीकरण सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत केले जाणार होते. मात्र आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच लसीकरण केले जाणार आहे.


9 केंद्रावर 40 बूथ 


पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, कूपर आणि जम्बो कोविड सेंटर या 9 लसीकरण केंद्रांवर 40 लसीकरण बूथ आहेत. या केंद्रांवर दिवसभरात 4 हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड-19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.


संबंधित बातम्या :



Covid Vaccination | ...त्यामुळं लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही; महाराष्ट्र आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण


Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लसी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे