लातूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संजय बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. त्यानंतर त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यात आली त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी ते सतत मतदारसंघात ठान माडून बसले होते. रुग्णालयात जात कोरोना रुग्णांना ते धीर देत होते. या सततच्या जणसंपर्कमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असावी.


लातूर जिल्ह्यात यापूर्वी औसाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, लातूर महानगरपालिकाचे माजी उपमहापौर देविदास काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता उदगीरच्या आमदार संजय बनसोडे यांना लागण झाली आहे.


या नेत्यांना कोरोनाची लागण, अनेकांनी केली मात
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री, मुंबईचे पालकमंत्री  अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली. अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री पॉझिटिव्ह


भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच आमदार मुक्ता टिळक यांनाही कोरोनाची लागण झाली. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली.  दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन, नाशिक देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.


या राजकारण्यांचा कोरोनामुळे मृत्यू


कोरोनाविरोधातील लढाईत काही राजकीय नेत्यांचा बळी देखील गेला आहे.   मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर,  ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी, जळगावमधील रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना कोरोनामुळं जीव गमावावा लागला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी, पडेगाव येथील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले, राष्ट्रवादीचे सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचा देखील कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे.