पंढरपूर : शहरात सध्या कोरोनाचा कहर सुरु असून एकट्या प्रदक्षिणा मार्गावरील 125 घरात 57 कोरोनाबाधित सापडल्याने आता हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे . पंढरपूर शहर व परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 350 पार जाऊनही राजकीय वादातून शहरात दुर्दैवाने अजून संचारबंदी लागू करायचे धाडस जिल्हा प्रशासन दाखवू शकलेले नाही.


विठ्ठल मंदिर परिसर काही दिवसापूर्वी सील करण्यात आला आहे. आता शहरातील गांधी रोड, नाथ चौक व घोंगडे गल्ली हा भाग सील करण्यात आला आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर , संत निवृत्तीनाथ व संत एकनाथ महाराजांचे मठ असून आता या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे. सध्या या परिसरात 10 स्वयंसेवक घराघरात जाऊन नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करीत असून नागरिकांना प्रशासनाने घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. या कोरोना वॉरियरचे नंबर या भागातील लोकांना देण्यात आले असून आपल्या गरजेच्या वस्तू नागरिक या वॉरीयरकडून मागवून घेत आहेत.


सध्या या भागात पोलिसांचा 24 तास खडा पहारा असून कोणालाही या भागात प्रवेश दिला जात नाही . या भागात येणारे सर्व रस्ते लाकडी बांबू लावून पूर्णपणे बंद करण्यात आले असून पोलिसांचा गस्त चालू आहे . सध्या या भागातून 57 रुग्ण सापडले असले तरी अजूनही नगरपालिकेच्या वतीने या भागातील नागरिकांची तपासणी सुरु असून प्रत्येक घर सॅनिटाईज करण्याचे कामही सुरु आहे .


सध्या शहरातील 57 भाग हे कोरोनाच्या रुग्णामुळे सील करण्यात आले असून तालुक्यातील 22 गावात कोरोना पोहचल्याने आता चिंता वाढू लागली आहे . सध्या असलेला 350 चा आकडा रोज वाढत चालला असताना जिल्हा प्रशासनाने आता राजकीय नेत्यांना फाटा मारून संचारबंदीचा निर्णय न घेतल्यास संपूर्ण पंढरपूर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याशिवाय राहणार नाही.


पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 31 जुलैपर्यंत बंद, मंदिर समितीचं परिपत्रक