मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी मुंबईत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होत आहे. मुंबईतील मोठ्या रुग्णालयांपैकी एका केईएम रुग्णालयात गेल्या 36 दिवसात 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे हे मृत्यू होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. केईएम रुग्णालयात होणारे मृत्यू मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे.
केईएम रुग्णालयात गेल्या 20 दिवसात 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 15 मे पासून आतापर्यंत 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे मृत्यू होत असल्याचं समोर येत आहे. केईएम रुग्णालयात 1 मे पासून 31 मे पर्यंत रोज सरासरी 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यानुसार 240 मृत्यू झाले आहेत.
तर 1 जूनपासून ते 20 जूनपर्यंत 221 मृत्यूंची नोंद झाली आहे. म्हणजे रोज सरासरी 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख यांनी याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या प्रभाव वाढत आहे. 15 मे पासून 20 जूनपर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा दुर्दैवी आहे, असं डॉ. हेमंत देशमुख यांनी म्हटलं.
ऑक्सिजनची कमतरता मृत्यूंचं कारण?
ऑक्सिजनची कमतरता केईएम रुग्णालयातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं की, रुग्णालयात 11 हजार लीटर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय टॉप-अप सिस्टमचाही वापर होत आहे. म्हणजेच 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक असताना नवीन ऑक्सिजन भरला जातो. केईएम रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत, मात्र ऑक्सिजनची कमतरता या मृत्यूंचं कारण नाही. अनेकदा रुग्णांना उशीराने रुग्णालयात दाखल केलं जातं. रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, त्यावेळी त्यांची मेडिकल हिस्ट्रीही महत्त्वाची आहे.
केईएम रुग्णालायाबाबत बाहेर येणाऱ्या माहितीमुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरले आहेत. ऑक्सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू होत नाही, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. मात्र मृत्यू होतायेत हे नाकारत नाही. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी करण्यावरही प्रशासानाने लक्ष दिलं पाहिजे.