पंढरपूर : "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. तसंच शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला," असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला. ते पंढरपुरात बोलत होते.


गोपीचंद पडळकर म्हणाले की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. मागील बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागेल."


पडळकर पुढे म्हणाले की, "राज्य सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. मला सरकारला सांगायचं आहे की आमचीही केस कोर्टात चालू आहे. तुम्ही का फी देत नाही? त्यावर बैठक का होत नाही? आमची प्रतिनिधी कमी आहेत म्हणून तुम्ही डावलता? राज्यात दोन नंबर असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल ज्यांचे छोटे समूह आहे, समाज आहे, ज्यांचे प्रतिनिधी कमी आहेत, त्यांची 60-70 वर्षात काय अवस्था करुन ठेवलीय हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सगळ्यांना शरद पवारांची भूमिका कळायला लागली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी, कोरोनाची परिस्थिती कमी झाल्यानंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत याची दखल सरकारने घ्यावी."


गोपीचंद पडळकरांनी तोंड सांभाळून बोलावं : जितेंद्र आव्हाड
गोपीनाथ पडळकर हे मोठ्या उंचीचे नेते आहेत आणि अशा लोकांचा मानसिक तोल कधीकधी ढासळतो. शरद पवारांना विचारधारा नाही, व्हिजन नाही, असं बोलण्याची हिंमत विरोधकांनाही कधी झाली नाही. ज्या माणसाने धनगरांचा विश्वासघात केला. क्षणभर प्रसिद्धीसाठी कुठल्याही पातळीवर घसरायचं हे काम भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी केलं आहे. भाजपसारख्या मनुवादी पक्षात हा बहुजन नेता करतो काय? गोपीचंद पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. याचे परिणाम गंभीर होती. जनमानसात क्षोभ निर्माण होईल. त्यामुळे तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल. अशा लोकांबद्दल न बोललेलं बरं, महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.


कोण आहेत गोपीचंद पडळकर?




  • गोपीचंद पडळकर यांनी महादेव जानकर यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षातून राजकारणात प्रवेश केला.

  • पडळकर यांनी 2009 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून रासपच्या चिन्हावरुन आमदारकी लढवली. धनगर आरक्षणच्या मुद्यावरुन पडळकर आक्रमक होते. त्यामुळे धनगर समाजाचे नेते म्हणून त्याची ओळख बनली.

  • पुढे रासपला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये सहभागी झाले. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर काम केले.

  • धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते भाजपतून बाहेर पडले आणि वंचित बहुजन आघाडीत गेले आणि 2019 ची लोकसभा सांगलीतून वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर लढवली. त्यावेळी त्यांनी तब्बल साडेतीन लाख मतदान घेतले.

  • 2019मध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करुन बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला.

  • यानंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी आणि ते आमदार म्हणून निवडून आले.


Gopichand Padalkar on Sharad Pawar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर