लातूर : लातूर शहरात लॉकडाऊननंतर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याची संख्या अचानकपणे वाढली. सकाळी 'मॉर्निंग वॉक' च्या नावाखाली अनेक लोक बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. यात अंबाजोगाई रोड,बार्शी रोड,औसा रोड आणि रिंग रोड भागातील नागरिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी धडक मोहीम राबवत या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासून जो माणूस रस्त्यावर आला त्या व्यक्तिला ठाण्यात आणण्यात येत आहे. मॉर्निंग वॉकला आलेल्या या लोकांना 'मी लातूरचा दुष्मन आहे' अशा पाट्या हातात घ्याव्या लागल्या. तसेच पोलीस ठाण्यात सूर्यनमस्कार काढावे लागले.

Lockdown | ट्रान्सपोर्ट सुरु करा, पुरवठा पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा कायम : वितरक

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात सध्या लॉकडाऊन आहे. मात्र घराबाहेर फिरण्याची वृत्ती असणाऱ्या लोकांना मॉर्निंग वॉक या काळातही गरजेचे वाटत आहे. याचमुळे एकाच वेळी लातूरच्या रस्त्यावर सकाळी वाढलेली लोकांची गर्दी पोलिसांच्या नजरेत आली होती. मागील दोन ते तीन दिवसात त्यांना समजावून सांगण्यात आले. मात्र ही गर्दी कमी होण्याऐवजी वाढत चालली होती. यामुळे लातूर पोलिसांनी धडक कारवाई करत आज 120 लोकांना ताब्यात घेतले. या लोकांना ठराविक अंतरावर पोलीस ठाण्यात समोरील मुख्य रस्त्यावर बसविले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे येत त्यांना बाहेर न फिरण्याबाबत समज दिली.


यावेळी या पकडलेल्या सर्व लोकांच्या हातात 'मी लातूरचा दुष्मन आहे. मला लातूरची चिंता नाही ' असे फलक दिले.


औसा शहरात बाहेर पडणाऱ्यांना पकडून करवून घेतले सूर्यनमस्कार

दुसरीकडे औसा शहरात देखील अनेक भागात सकाळी फिरायला आलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आपल्या आरोग्याची काळजी करणाऱ्या या लोकांना पोलिसांनी ठाण्याच्या आवारात चक्क सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले. सुदैव आहे की लातुरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.