पंढरपूर : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत WHO पासून सर्वच तज्ञ सांगत असताना प्रशासन आणि नागरिकांची बेफिकीर वाढत चालल्याने सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके पुन्हा हॉटस्पॉट बनण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा आणि करमाळा या पाच तालुक्यातच जिल्ह्यातील 80 टक्के रुग्ण सापडत असताना या भागातील नागरिक मात्र अत्यंत बेफिकीर पद्धतीने वागताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून माळशिरस आणि पंढरपूरमध्ये आकडे चढत्या क्रमाने वाढू लागल्याने पुन्हा हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरमध्ये लगबग सुरु होत असताना प्रशासनाने 2 जुलैपासून आरोग्य विभागात भरलेल्या तात्पुरत्या नर्सिंग आणि इतर कोविड कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने वाढत्या रुग्णांची देखभाल कशी होणार हा प्रश्न उभा राहिला आहे. 


आषाढी जवळ असताना रुग्ण वाढतायेत
सध्या नोकरीतून कमी केलेले हे आरोग्यसेवक माणुसकीच्या नात्याने बिनपगारी या वाढत्या कोरोना रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. सांगोला परिसरात गुरुवारी 30 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्येचा आकडा 439 झाला आहे. मात्र, आजही सांगोल्याच्या रस्त्यावर आणि तहसील कार्यालय बाजार परिसरात कुठेच कोरोना नियम पाळत असल्याचे  चित्र नाही. तीच अवस्था माळशिरस तालुक्याची असून परवा एकाच दिवशी 200 रुग्ण सापडलेल्या माळशिरसमध्ये काल (गुरुवारी) 134 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या 786 वर पोचली आहे. तरीही अकलूजमध्ये गेल्या 24 दिवसांपासून सुरु असलेल्या नगरपरिषदेच्या बेमुदत आंदोलनस्थळी शेकडोंनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये आषाढीच्या तोंडावर 123 नवीन रुग्ण सापडले असून येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 497 झाली आहे. अशीच अवस्था माढा आणि करमाळा परिसरात झाली असून जिल्ह्याच्या जवळपास 80 टक्के रुग्ण या पाच तालुक्यातच दिसून येत आहेत. 
      
कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांची हेळसांड
नागरिकांकडून बेफिकिरी सुरु असताना प्रशासनालाही सावळा गोंधळ आता दिसू लागला आहे. जिल्ह्यातील काही भागात रुग्ण कमी होऊ लागल्याने कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना 2 जुलैपासून कामातून कमी करण्यात आल्याने हॉटस्पॉट असलेल्या भागात रुग्ण वाढू लागलेत मात्र कर्मचारी कमी केल्याने रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज कोवीड केअर सेंटरमध्ये अशीच अवस्था सध्या दिसू लागली आहे. आता रोज रुग्णांची संख्या वाढू लागली असताना केवळ एक किंवा दोन कर्मचारी सेवेत आहेत. रोज वाढणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी आता कामावरून कमी केलेले कर्मचारी, नर्सेस रोज नियमितपणे येऊन माणुसकीच्या नात्याने या रुग्णांना सेवा देत आहेत. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कमी करताना ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढती आहे. तिथे तरी किमान गरजे एवढे कर्मचारी नेमणे आवश्यक असताना कोरोना रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार सुरु झाल्याचे दिसत आहे.