कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज अधिकाऱ्यांना धावतच प्रवेश करावा लागला. त्याचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांच्या आधी आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले होते. राज्याचे आरोग्य मंत्री आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. दरम्यान ही बैठक नियोजित नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.


कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडायला सोमवारपासून परवानगी देण्याचे संकेत


कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडायला सोमवारपासून परवानगी देण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.  कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राजेश टोपे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना व्यापार सुरू करायला परवानगी देण्याबाबत निवेदन सादर केलं. यावेळी व्यापाऱ्यांशी बोलताना टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी येत असून जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू करायला परवानगी मिळू शकते.  याबाबतच्या आदेश दोन दिवसात काढले जातील अशी देखील ग्वाही यावेळी टोपे यांनी शिष्टमंडळाला दिली. या निर्णयामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान जबाबदार मंत्र्यांनी आश्वस्त केल्यामुळे व्यवसाय सुरू होतील अशी खात्री आम्हाला खात्री आहे...मात्र तसं झालं नाही तरी सोमवारपासून व्यवसाय सुरू करणार असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्या दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिलं.. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण आढावा बैठक घेऊन वीस दिवस झाले तरी रुग्ण वाढ थांबलेली नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे  त्याचबरोबर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था असून एकाने बैठक घेतली की दुसरा बैठक घेतो अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता शिष्टमंडळाने टोपे यांच्या समोर केली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपायोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.