धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आतापर्यंत एसटीच्या 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तर 277 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 117 कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 154 कर्मचाऱ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, लॉकडाऊनमुळे 113 दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला आहे. तर एसटीच्या मालवाहतुकीच्या माध्यमातून 47 दिवसांत एसटीला 1.67 कोटींचं उत्पन्न मिळालंय.


कोरोना, लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झालाय. त्याला राज्याची जीववाहिनी असलेली एसटी तरी कशी अपवाद राहणार. कोरोनाच्या या महामारीत एसटी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत धावली. इतकंच नाही तर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी थेट कोट्यापर्यंत पोहचली. तिथून महाराष्टाच्या कानाकोपऱ्यापर्यंत धावली. एरवी प्रवाशांच्या सुख-दुःखाला धावणाऱ्या या आपल्या सर्वांच्या लाडक्या एसटीला आज गरज आहे ती आर्थिक पाठबळाची. दर वेळी प्रवाशांना सवलत देणाऱ्या एसटीला आज गरज आहे ती विविध करात सवलत देण्याची.


एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा, कामगारांमध्ये असंतोष


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झालं. परिणामी एसटी सेवा ठप्प झाली. मुंबई विभागात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजही एसटी धावतेय. राज्यातील इतर विभागात देखील एसटीची तुरळक सेवा सुरु आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, लॉकडाऊनमुळे 113 दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला आहे. कोरोनाच्या या महामारीत, लॉकडाऊन मुळे आर्थिक घडी कोलमडलेल्या एसटीला सावरण्यासाठी प्रशासनानं काही प्रयत्न केलेत. जसे की एसटीची मालवाहतूक सेवा. सध्या साधारण 290 एसटीची मालवाहतूक वाहनं (ट्रक ) तयार आहेत, तर आणखी 80 मालवाहतूक वाहनं (ट्रक) बांधणीचं कामं सध्या सुरु आहे. 21 मे ते 6 जुलै या 47 दिवसांत मालवाहतुकीच्या माध्यमातून एसटीच्या तिजोरीत एक कोटी ६७ लाखांचं उत्पन्न आलंय. यासाठी 3 हजार 800 फेऱ्या झाल्यात. तर 5 लाख 65 हजार 375 किलोमीटर अंतर पार करण्यात आलंय. एसटीला मालवाहतुकीच्या माध्यमातून आणखी उत्पन्न मिळण्यासाठी सरकारनं स्वतःहून पुढाकार घेत राज्यातील सर्व प्रकारच्या सरकारी गोदामातील वाहतूक मग ती धान्याची असो, रेशनिंगची असो, बियाणे, खतांची असो अशी सर्व वाहतूक एसटीच्या मालवाहतुकीच्या माध्यमातून होईल, यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. यासाठी एसटीच्या संघटना आग्रही आहेत.


एकीकडे वेतन कपात तर दुसरीकडे कोरोना आजाराने त्रस्त; एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची व्यथा


महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या परिवाराची सदस्य संख्या 1 लाख 10 हजार आहे. कुटुंबातील सदस्य एसटीला प्रवाशी कर, इंधन कर, पथकर ( टोल टॅक्स ) यातून सूट मिळावी यासाठी संघर्ष करत आहेत. 1 जूनला एसटीने 72 वर्ष पूर्ण केलेत. ज्या प्रमाणे जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत देते त्याप्रमाणे 73 वर्षात देखील सर्वांच्या सुख-दुःखाला धावणाऱ्या एसटीला सरकारनं सवलत, सूट देण्याची गरज आहे. एसटीला सध्या खरी गरज आहे ती आर्थिक पाठबळाची, सवलत, सूट देण्याची. तसेच एसटीच्या परिवारातील सदस्यांची उपासमार होणार नाही, त्यांना कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होणार नाही यासाठी त्यांना पूर्ण वेतन मिळण्यासाठी मायबाप सरकारनं प्रयत्न करण्याची आवशकता आहे .