पुणे : उभ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचं आयोजन करण्यात येतं. तब्बल 18 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. काल सायंकाळी सहा वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसऱ्याचा समारोप खंडा तलवारीचा मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर झाला.
मल्हारी मार्तंड, जय मल्हार... जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेलं पिवळेपण हे ठिकाण जेजुरी गडाचं. उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रात जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला मर्दानी दसरा म्हणून ओळखलं जातं.
खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल झाले होते. जेजुरीकरही वर्षभर कुठेही असले तरी दसऱ्यानिमित्त गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होत असतात. काल दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली.
श्री. मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींना आणून त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा रात्री दोन वाजताच्या सुमारास पार पडला. पालखी सोहळा रमण्यात जाण्याअगोदर दुपारपासूनच खांदेकरी, मानकरी आणि तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या मर्दानी खंडा तलवार स्पर्धेत येथील या स्पर्धकाने गेले अनेक दिवस यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगते ती म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा. 12 वर्षांपासून ते 60 वर्ष वयोगटातील भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल 42 किलोंची असणारी तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातान उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.
42 किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षापूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.
या मर्दानी दसऱ्याच्या खेळातून भक्त खंडोबारायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात. यानिमित्ताने देवा तुझी सोन्याची जेजुरी असा सोहळा भाविक याचि देही याची डोळा अनुभवतात.
जेजुरी गडावर दसऱ्यानिमित्त 18 तास मर्दानी खेळांचा थरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Oct 2018 07:23 PM (IST)
खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसऱ्याचा समारोप खंडा तलवारीचा मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर झाला. खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल झाले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -