लातूर : प्रकल्पाची घोषणा होऊनही त्या प्रकल्पातून उत्पादन बहुतांशवेळा निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा तर प्रकल्पाची घोषणा होते आणि ते प्रकल्प रेंगाळतात. मात्र मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिली रेल्वे कोच शेल तयार झाली आहे. तीही अगदी वेळेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या ट्विटरवरून ट्विट केला आहे. सुशासन दिवस अर्थात स्व . अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ही पहिली कोच शेल पूर्णत्वाने साकारण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. या प्रकल्पामुळे 5 हजार जणांना थेट आणि 10 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या काळातही रेल्वे विभागाने वेगात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.


रोजगार निर्मिती , व्यवसाय वृद्धी आणि आत्मनिर्भरता प्रदान करणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात लातूर जिल्ह्यासाठी निश्चित आशादायी आहे. मराठवाड्यात मोठा प्रकल्प उभा राहिल्याने सुशिक्षित युवक मराठवाडा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचे प्रमाण यामुळे कमी होणार आहे. मराठवाड्याच्या विकासामध्ये यामुळे मोलाची भर पडणार असून स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत पहिली कोच निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते पूर्ण करता आल्याने आनंद होत असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


मराठवाडा कोच फॅक्टरीबाबत महत्वाच्या तारखा
मराठवाडा कोच फॅक्टरीबाबत फेब्रुवारी 2018 मध्ये सामंजस्य करार केला गेला. एप्रिल 2019 मध्ये याचे भूमिपूजन झाले. नोव्हेंबर 2019 मध्ये बांधकाम सुरू झाले आणि त्यावेळी घोषित केलेल्या तारखेला म्हणजे 25 डिसेंबर रोजी पहिला कोच शेल बांधला गेला. राज्य शासनाने RBNL रेल्वे विकास प्राधिकरणाला लातूर एमआयडीसीची 300 जमीन हस्तांतरीत केली. तीन टप्प्यातला पहिला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधी 25 डिसेंबर 2020 होता.


जानेवारी 2018 : लातूर येथे मेट्रो कोच प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय जाहीर
फेब्रुवारी 2018 : रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार
31 मार्च 2018 : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन
30 ऑगस्ट 2018 : अवघ्या 5 महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश निघाले
11 सप्टेंबर 2018: अवघ्या 11 दिवसात रेल्वे विभागाकडून एमआयडीसीकडे जागेसाठी जवळपास 22 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला
ऑक्टोबर 2018 : कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली
25 डिसेंबर 2020: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मेट्रो कोच शेलच्या प्रत्यक्ष निर्मितीही सुरुवात


25 डिसेंबरला पहिल्या कोच शेलची निर्मिती पूर्ण 


लातूरचा हा कारखाना देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला कारखाना आहे. प्रकल्प जाहिर झाला तेव्हाच 25 डिसेंबर 2020 ला पहिली रेल्वे बोगी तयार होईल असे घोषित केले होते. ती तारीख पाळली गेली आहे. लातूरच्या येथील रेल्वे बोगी (कोच) कारखान्यातून शुक्रवारी म्हणजे 25 डिसेंबरला पहिल्या कोच शेलची निर्मिती पूर्ण झाली. हा कोच शेल तयार करून सुशासन दिनी रेल्वेने पहिले पाऊल टाकत प्रत्यक्ष निर्मितीला सुरवात केली. अडीच वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने अतिरिक्त एमआयडीसी परिसरात प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. रेल्वेमंत्री गोयल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला. प्रकल्पाचे नामकरण मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरी होऊन टप्प्याटप्प्याने कारखान्यात रेल्वे कोच निर्मितीच्या सुविधा तयार झाल्या. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील या अत्याधुनिक कारखान्यातून मोठ्या संख्येने रोजगार मिळेल व लातूर भागात एक औद्योगिक परिसंस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यानिमित्त रेल्वेने मेक इन इंडिया ला वेगळी उंची मिळवून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.