Winter sesesion Update : विधानसभेतआज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राज्याचे परिवहन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांचं निलंबन करावं अशी मागणी करत शिवसेना सदस्य आज विधानसभेत (Vidhan Sabha) चांगलेच आक्रमक झाले. त्यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.  


आमदार सुहास कांदे यांनी हा विषय सभागृहात मांडला. त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा आपण असं बोलणार असं म्हटलं आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणं योग्य नाही.  जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही, असं कांदे म्हणाले. 


कांदे म्हणाले की,  मोदींबाबत जेव्हा भास्कर जाधव यांनी कृती केली तर त्यांनी त्याबाबत माफी मागितली. आता नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत तत्काळ निलंबन करा अथवा तात्काळ माफी मागायला हवी. नितेश राणे यांच्याकडून आपण वारंवार असं बोललं जातं आहे की मी असं पुन्हा बोलणार. अध्यक्षांनी समज देऊन देखील जर ते चूक करत असतील तर त्यांचं निलंबन व्हायला हवं, असं ते म्हणाले.


यानंतर भास्कर जाधव म्हणाले की, मी तीन दिवसांपूर्वी काही वक्तव्य केलं त्यावेळी मी माफी मागितली. आता दोन दिवसांपूर्वी जी नितेश राणे यांनी टिप्पणी केली त्यांनी जो आवाज काढला तो मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन तालिका अध्यक्ष यांनी विषय संपवला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होत की हा विषय हा लाईटली घेऊ नका.  भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना कायम स्वरूपी निलंबित करण्याची मागणी केली. 


यानंतर सर्व सदस्य अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी केली. तसेच नितेश राणे हाय हायच्या जोरदार घोषणा दिल्या. यामुळं सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  नितेश राणे यांच्याबाबत जो मुद्दा उपस्थित झाला. त्याबाबत आम्ही बोललो की असं व्हायला नको होतो. भास्कर जाधव भुजबळांना बघून हुप हुप करायचे. याचं देखील समर्थन होऊ शकत नाही. जर हे ठरवून आला असाल की आमदाराला निलंबित करायचं आहे हे लोकशाहीला धरून नाही, असं फडणवीस म्हणाले.  मी स्वतः भूमिका घेतली होती की नितेश राणे यांनी चुकीचं केलं आहे. आधी तुम्ही 12 निलंबित केले आता आणखी एक निलंबित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे.   सरकार बदलत असतात एकदा तुम्ही जर पायंडा पाडला तर पुढील काळात विरोधक उरणार नाहीत, असं फडणवीस म्हणाले. 


नवाब मलिक म्हणाले की, सभागृहात पोलीस सुद्धा आत येऊ शकत नाही. त्याचा निर्णय अध्यक्ष घेत असतात. एखादा सदस्य चुकीचं वागत असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. भास्कर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सदरचे सदस्य उपस्थित नाहीत मात्र त्यांचा खुलासा मागवायला हवा, असं मलिक म्हणाले. 


नंतर तालिका अध्यक्ष लोकं सभागृहाचं कामकाज पाहात असतात. लोकांची सभागृहात गोंधळ चालतो अशी भावना होऊ नये, बैठक घेऊन या विषयावर चर्चा करु असं म्हणत अध्यक्षांनी चर्चेला पूर्णविराम दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या




अधिवेशनाचे दोन दिवस उरले; आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha