Maharashtra Congress News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाने सहा पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कुही तालुक्यातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. रामटेकमध्ये ( Ramtek) काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत राजू पारवे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस कुही शहर काँग्रेस अध्यक्ष विलास राघोर्ते, कुही नगर परिषदेच्या अध्यक्षा हर्षा इंदुरकर, उपाध्यक्ष अमित ठवकर तसेच नगरसेवक मयूर तळेकर, रुपेश मेश्राम, निशा घुमरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर पक्षाकडून लावण्यात आला होता. 


सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित


पक्षविरोधी काम केल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी तशा आशयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला होता. त्याची दखल घेत नाना पटोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. 


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा?


राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये 13 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असून, त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या असून, त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला राज्यात 17 जागा मिळाल्या होत्या. तर सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली होती. महायुतीनं या निवडणुकीत 45 प्लस जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, त्यांना अपेक्षीत यश मिळालं नाही. 


देशात कोणत्या पक्षाला किती जागा?



  • भाजप – 240

  • काँग्रेस – 99

  • समाजवादी पार्टी – 37

  • तृणमूल काँग्रेस – 29

  • डीएमके – 22

  • टीडीपी – 16

  • जेडी(यू) – 12

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9

  • एनसीपी (शरद पवार)-8

  • शिवसेना – 7

  • लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5

  • वायएसआरसीपी – 4

  • आरजेडी – 4

  • सीपीआय (एम) – 4

  • इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3

  • आप – 3


देशात भाजपने 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, भाजपला 240 जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसने मात्र, चांगली प्रगती करत 99 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच समाजवादी पार्टीने देखील उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का देत 37 जागांवर विजय मिळवला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांची मुसंडी, निंबाळकरांना दणका, कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य?