Akola News अकोला : अकोला येथे घडलेली घटना ही कुणापासूनही लपून राहिलेली नाहीये. माझ्या कार्यकर्त्याने वरून पायावर पाणी टाकले. तिथे नळ उपलब्ध नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्याने पायावर बॉटल ने पाणी टाकले. मी शेतकरी आहे. त्यामुळे मला या चिखलाची सवय आहे. या ठिकाणी चिखल होता म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन करणार नाही, असा कुठलाही प्रकार नाही. किंबहुना या चिखलाचा मला काहीही फरक पडत नाही. मी काही राजा नाही, तसेच मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवरायांचा मावळा आहे आणि मावळा हा मावळ्याप्रमाणेच कायम राहील. असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या कार्यकर्त्याने पाय धुतल्या प्रकरणी भाष्य करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
नेमका प्रकार काय?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. यावेळी नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं धुतले. विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना याबाबत आता स्व:ता नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
म्हणूनच मोदी सरकारला जनतेने नाकारलं
एकीकडे शेतकरी कर्जाच्या चिखलात फसलेला आहे. त्या शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. दुसरीकडे महावितरणाचा गोंधळ सुरू आहे. दिवसागणिक विजेचे दर वाढत आहेत. सर्वसामान्यांचे कंबडे मोडले आहे. शेतकऱ्यांना वेळेत वीज उपलब्ध होत नाही. या सगळ्या गोष्टींकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्रात म्हणूनच मोदी सरकारला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे राज्यात आता मोदी मोदी करून काहीही उपयोग होणार नाही, असा सल्ला माझा सत्ताधाऱ्यांना असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.
सरकारने प्रीपेड मीटरचा घाट घातला आहे. मात्र, जनतेनेच याला विरोध दर्शवला असून लिखित स्वरूपात आम्हाला अशा स्वरूपाचे मीटर नको, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. याबाबत सरकारने जनतेला पर्याय दिला होता. आज इतके आंदोलन होऊन देखील सरकार ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. ऐकुणात आज राज्यात मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे जनतेला तुम्ही चिखलात फसवत आहात. सर्वसामान्यांची लूट सध्या सुरू आहे. असे माझे स्पष्ट मत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
इंग्रजांनी केले नाही ते हल्लीचे मोदी सरकार करतंय
सरकार शेतकरी विरोधी आहे. हे गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे. नाशिक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. एका शेतकऱ्याने सांगितलं होतं की कांद्याच्या प्रश्नावर बोला, त्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना आपल्या वेदना देशाच्या पंतप्रधाना पुढे देखील मांडता येत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत. त्यावरूनच शेतकरी विरोधी यांची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. जे पाप इंग्रजांनी केले नाही ते हल्लीचे मोदी सरकार करत आहे. असेही नाना पटोले म्हणले.
इतर महत्वाच्या बातम्या