राहुल गांधी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी राहुल गांधींसमोर एकूण तीन जागांचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये नांदेड, अमेठी आणि मध्य प्रदेशातील एका जागेचा समावेश आहे.
राहुल गांधी हे नांदेडमधून निवडणूक लढवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेत भल्या-भल्यांना पराभवाचा फटका बसला, मात्र अशोक चव्हाण हे खासदारपदी निवडून आलेले काँग्रेसचे राज्यातील एकमेव उमेदवार होते. त्या अर्थाने नांदेड हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो.
एखाद्या उमेदवाराला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातसोबत उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी निवडणूक लढवली होती, त्याचा फायदा मोदींना झाला. त्यामुळे काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल गांधीही अशाप्रकारे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.
उत्तर प्रदेशातील अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून राहुल गांधी निवडणुकीला उभे राहणार आहेतच. त्याशिवाय नांदेड आणि मध्य प्रदेशातील एका जागेचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप यांच्या महाआघाडीने अमेठीच्या जागेवरुन उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही भाजपकडून स्मृती इराणींनी निवडणूक लढवली, तरी गेल्या वेळीप्रमाणे राहुल गांधी त्यांना तगडं आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूणच राहुल गांधींसमोर उत्तर प्रदेशात मोठं आव्हान नसेल.
कार्यकर्त्यांना नवचैतन्य
दुसरीकडे, उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं मोठं राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणाहून पक्षश्रेष्ठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळू शकतं. त्यासोबतच कर्नाटक, तेलगंण या आजूबाजूच्या राज्यांनाही त्याचा फायदा होईल. याशिवाय नांदेडला धार्मिक महत्त्व असल्यामुळे त्याचं कनेक्शन थेट पंजाबशी जुळतं.
सुरक्षित मतदारसंघ
नांदेड हा काँग्रेस बालेकिल्ला असल्याने राहुल गांधींसाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा घेतली होती. तेव्हा लाखोंचा जनसमुदाय जमल्याचा दावा केला गेला. मात्र 2014 मध्ये अशोक चव्हाणांना 4 लाख 93 हजार 75 मतं, तर भाजप उमेदवार दिगंबर पाटील यांना 4 लाख 11 हजार 620 मतं मिळाली होती.
नांदेड लोकसभा निवडणुकांचा इतिहास
1980 शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
1984 शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
1987 अशोक चव्हाण (काँग्रेस) पोटनिवडणूक
1989 डॉ. व्यंकटेश कबडे (जनता दल)
1991 सूर्यकांता पाटील (काँग्रेस)
1996 गंगाधर कुंटुरकर (काँग्रेस)
1998 भास्करराव खतगावकर (काँग्रेस)
1999 भास्करराव खतगावकर (काँग्रेस)
2004 दिगंबर पाटील (भाजप)
2009 भास्करराव खतगावकर (काँग्रेस)
2014 अशोक चव्हाण (काँग्रेस)
नांदेडमध्ये नऊपैकी तीन आमदार काँग्रेसचे
भोकर - अमिता अशोक चव्हाण
नांदेड उत्तर - डी पी सावंत
नायगाव - वसंतराव चव्हाण