मुंबई : प्रशासकीय बाबू आणि नेते.... बघायला गेलं तर या दोघांचं नातं तसं घट्ट. राजकीय नेते नेहमीच प्रशासनावर बोट ठेवत 'अधिकारी बाबू' कामच करत नसल्याची बोंब मारतात. मात्र आता हेच अधिकारी हळूहळू राजकारणात येऊ पाहत आहेत.
याआधीही राजकरणात अनेक माजी अधिकाऱ्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. नोकरी करता करता अनेक अधिकारी बाबूंनी आपली एक राजकीय दिशा ठरवली आणि राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या निवडणुका तोंडावर आहेत. याच निमित्ताने अनेक अधिकारी राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत.
कोणकोणते अधिकारी 2019 च्या निवडणुकीत दिसू शकतील?
1) किशोर गजभिये, निवृत्त सनदी अधिकारी
2) हिकमत उडाण, माजी अतिरिक्त आयुक्त
3) ज्ञानेश्वर मुळे, सचिव (कार्यरत)
4) प्रभाकर देशमुख, निवृत्त सनदी अधिकारी
5) शामसुंदर शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी
6) उत्तम खोब्रागडे, निवृत्त सनदी अधिकारी
7) संभाजी झेंडे-पाटील, निवृत्त सनदी अधिकारी
8) विजय नाहटा, निवृत्त सनदी अधिकारी
राजकारणात एन्ट्री घेणारी ही नावं काय साधीसुधी नाहीत, प्रत्येकाने आपली कारकीर्द चांगलीच गाजवली आहे. एक नजर टाकूया या अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीवर.
1. किशोर गजभिये
किशोर गजभिये हे 1987 सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी. सामाजिक न्याय विभागातून निवृत्ती घेत त्यांनी 2014 साली बसपकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून उत्तर नागपूर या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
2. हिकमत उडाण
हिकमत उडाण हे 1991 च्या बॅचचे डेप्युटी कलेक्टर. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांनी नशिब आजमावलं होतं. थेट राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांना उडाण यांनी आव्हान दिलं होतं, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुन्हा नशिब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत
3. ज्ञानेश्वर मुळे
भारतीय विदेश सेवेचे अधिकारी ज्ञानेश्वर मुळे लवकरच निवृत्त होत आहेत. मुळे अमेरिकेत भारताचे राजदूत होते. अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. 1982 साली एमपीएससी करुन पुण्याचे उपजिल्हाधिकारी झाले होते. पुढच्याच वर्षी विदेश सेवेत दाखल झाले. मुळेंनी भारताचा प्रतिनिधी म्हणून अनेक देशात चमकदार कामगिरी केली. शेतकरी नेते राजू शेट्टींच्या विरोधात मुळे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.
4. प्रभाकर देशमुख
निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनी माढ्यातून उमेदवारी मागून मोहित पाटलांना धक्का दिला. देशमुख एकेकाळी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते. बराच काळ त्यांनी पुणे विभागाचं आयुक्तपद भूषवलं होतं. पण पहिल्यांदाच ते राजकारणात आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाले आहेत
5. श्यामसुंदर शिंदे
श्यामसुंदर शिंदे हे माजी परिवहन आयुक्त. मूळचे कंधार तालुक्यातली हळदा गावचे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे ते मेहुणे आहेत. शिंदेंनी भाजपच्या तिकिटावर विधानपरिषद लढवली. आता नांदेड लोकसभेसाठी शिंदेंचं नाव चर्चेत आहे.
6. उत्तम खोब्रागडे
उत्तम खोब्रागडे हे 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याआधी त्यांनी रामदास आठवले आणि नंतर राम विलास पासवान यांच्या जनशक्ती पक्षात प्रवेश केला होता. म्हाडा, अन्न व औषध प्रशासन, तसेच बेस्टच्या कारभार त्यांना सांभळला आहे. आता मुंबईच्या दक्षिण मध्य या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
7. संभाजी झेंडे पाटील
संभाजी झेंडे पाटील हे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. म्हाडात कार्यकाळ संपवून ते निवृत्त झाले. त्यांचे वडील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, तर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मेहुणे. घरातच राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आगामी काळात पुण्याच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे
8. विजय नाहटा
राष्ट्रवादीचे बलदंड नेते गणेश नाईकांच्या परभवाला विजय नाहटा कारणीभूत ठरले. विजय नाहटा राजकारणात स्थिरावले आहेत. शिवसेनेचे उपनेते झाले आहेत. सध्या ते झोपटपट्टी पुनर्विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. नाहटा 2014 साली कोकण विभागाचे महसूल आयुक्त म्हणून निवृत्त झाले आणि लगेच सेनेत आले.
राजकारणात अंगठेबहाद्दर मोठमोठी पदं भूषवतात, राजकारणात उच्चशिक्षित कमी येतात अशी बोंब मारली जाते, पण हे सनदी अधिकारी निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याबाबत होत असलेली चर्चा लक्षात घेता राजकारणात आता उच्चशिक्षित जास्त येताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा होती, अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही. पण असे अनेक नावाजलेले चेहरे राजकारण्यांना आपल्या पक्षात असावे, असं वाटत असतं. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढवली आणि आता ते केंद्रात मंत्रिपद भूषवत आहेत. प्रशासनात काम करताना नेत्यांच्या संगतीने याआधी अनेक अधिकारी राजकारणात आले. परंतु तितके यशस्वी होऊ शकले नाहीत, त्यामुळे आता राजकारणात इतके सनदी अधिकारी उतरत आहेत त्याचं भवितव्य काय असणार, हे येणारा काळ ठरवेल.
'हे' आजी-माजी प्रशासकीय बाबू राजकारणाच्या वाटेवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2019 05:03 PM (IST)
2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेक आजी-माजी प्रशासकीय अधिकारी राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. या बाबूंच्या कारकीर्दीवर एक नजर
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -