भंडारा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. भंडारा येथे बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
त्यांनी म्हणाले की, केंद्रसरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. लोकशाहीच्या मार्गाने जसं आधी मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांनी भूमिका मांडली, तशीच आताही भूमिका मांडावी, जर त्यांनी भूमिका नाही मांडली तर त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
सत्तेत आल्यावर मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : नाना पटोले
यावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे हास्यास्पद आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर बसल्यानंतर नाना पटोलेंना विस्मरण झालं आहे. काँग्रेसचा आत्मा हुकुमशाहीचा आहे, चेहरा मात्र लोकशाहीचा आहे. जनहितासाठी आम्ही बोलतो असं सांगायचं आणि पूजीपतींना मोठं करण्याचं काम करायचं, असं त्यांचं काम आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. आधी नाना पटोले हे स्वता काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याचं म्हणायचे. नाना पटोलेही आधी काँग्रेसच्या विरोधात टिवटिव करायचे. शेतकरी आंदोलनादरम्यान काही नेते ट्विट करुन मनात जागा करण्याचा प्रयत्न करतेय. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, असं ते म्हणाले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेमकं काय झालंय, हे शोधावं लागेल. यांना शेतकऱ्यांबद्दल काही प्रेम नाही. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं योगदान या लोकांनी तपासावं. त्याचं सामाजिक योगदान असताना नवीन अध्यक्ष झाल्यावर सनसनाटी काही तरी यावं म्हणून प्रयत्न केला जात आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.