भंडारा : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे, महाराष्ट्रातील एका व्यक्तीला, माजी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) एका भागात जावू न देणे, ते त्या ठिकाणी आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं सांगणे आणि त्या माध्यमातून त्यांचे पोस्टर फाडले जात असतील तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या उपाययोजना करून महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र फिरायला मनाई करीत असेल तर या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करू असंही ते म्हणाले. 


महाराष्ट्रात कधीही एवढ्या खालच्या पातळीचं आणि हेवेदाव्याचं राजकारण झालेलं नाही. मात्र आता भाजपचं सरकार घाणेरडं राजकारण करतेय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय. 


महाविकास आघाडीवर परिणाम नाही


अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीवर काहीच परिणाम पडणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात जनमानसाचा पक्ष आहे.  लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. जे आमच्या बरोबर भाजपच्या विरुद्ध लढायला तयार असतील, त्यांना सोबत घेवून चालायची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या कुटुंबात काय होतं, काय नाही होत, हे बघण्याच कारण आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीवर दिली.


सरकारचेच लोक या ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील


ललित पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सरकारचेच लोक ही ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील आहेत आणि म्हणून ललित पाटीलला त्रास होऊ नये, म्हणून याची काळजी सरकारकडून जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था दिल्या गेल्या होत्या. राज्यातील तरुण पिढी बरबाद करणारा हा ललित पाटील, त्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत जोडले गेलेले आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स महाराष्ट्रात येतोय. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची प्रॉपर हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून चौकशी करावी ही मागणी काँग्रेसने केलेली आहे. 


नाना पटोले म्हणाले की, राज्यातील तरुण पिढी आणि कुटुंब उद्ध्वस्त करणं हे काम भाजप मुद्दामहून करतेय का? असा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळं याच्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. ललित पाटील हा चेहरा दिसतोय पण त्याच्या मागे सत्तेत बसलेले लोक सहभागी आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. 


ही बातमी वाचा: