मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर होण्याची चिन्हं आहेत. गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली होती. पाटील हे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच आले होते.





या बैठकीला प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान कृषी विधेयकांचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते. या शिष्टमंडळात अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते जाणार होते. मात्र एच. के. पाटील यांच्यासोबत गुरुवारी असलेले नेते वगळून इतर नेते आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, यशोमती ठाकूर  खासदार धानोरकर, मंत्री के.सी.पाडवी राजभवनावर जाणार असल्याची माहिती आहे.


यासंदर्भात मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्याचे काँग्रेस प्रभारी कोरोनाबाधित झाल्याचे कळले. आता आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आम्ही काळजी घेत कामं करत आहोत. आम्ही सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर अशी काळजी घेत आहोत.  आम्ही काळजी घेत त्या दिवशी देखील कार्यक्रम घेतले होते, असं थोरात म्हणाले. कृषि विधेयकाविरोधात आमचं आंदोलन सुरु आहे. आणि यासंदर्भात आम्ही आज पाच वाजता राज्यपालांना भेटणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.


थोरात यांनी जरी पाटील यांच्यासोबत असताना नियमांचं पालन केलं असल्याचं म्हटलं असलं तरी त्या बैठकीतील छायाचित्रांमध्ये मंत्री अशोक चव्हाण यांनी मास्क व्यवस्थित लावलेला दिसत नाही. तसेच एका हॉलमध्ये बसलेल्या नेत्यांमधील अंतर देखील फार कमी असल्याचं दिसत आहे.