सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती व सरकारच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीचं पुस्तक फाडत असताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेबांचा फोटोही फाडण्यात आला. त्यामुळे, आव्हाड यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने आव्हाडांविरुद्ध आंदोलन करुन हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचं म्हटलं. तर, आपल्याकडून अनावधानाने ही चूक झाली असून त्याबद्दल मी माफी मागतो, असे म्हणत आव्हाड यांनी संबंधित घटनेवर माफीही मागितली. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण करत, त्यांनी हे कृत्य मुद्दामून केलं नसल्याचं म्हटलं. आता, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मनुस्मृतीचा श्लोक अभ्यासक्रमात कुठेही घेतला जाणार नसल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.  


मनुस्मृतीमधील काही श्लोक अभ्यासक्रमात घेतले जाणार अशी चर्चा होती. मात्र, असे कोणतेही श्लोक अभ्यासक्रमात घेतले जाणार नसल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला सांगितले, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज पंढरपूर येथे वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित संत चोखामेळा पुण्यतिथी सोहळ्यास आठवले आले होते. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संत चोखामेळाचे वंशज सुनील सर्वगोड, ऍड कीर्तिपाल सर्वगोड व इतर मान्यवर उपस्थित होते. येथील पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच, मनुस्मृतीवरील चर्चेवरही सरकारची भूमिका सांगितली.  
     
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती फाडण्याचं आंदोलन झालं, त्यावरून रामदास आठवले यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीमधील जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि महिलांवरील अन्यायाच्या भूमिकेला कडाडून विरोध करीत मनुस्मृती जाळली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली म्हणून आव्हाड यांनी सुद्धा जाळणे अजिबात गरजेचे नाही. जितेंद्र आव्हाड यांनी नाटक करण्याचा आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला. भांबावलेल्या परिस्थितीत जितेंद्र आव्हाड होता, अशा शब्दात आठवलेंनी आव्हाडांवर निशाणा साधला. आव्हाड नशेत होते की काय मला माहित नाही, पण त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर स्वरूपाची असून जितेंद्र आव्हाडांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली आहे. 


पुणे अपघात अन् अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य


पुणे अपघात प्रकरणात अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. या संदर्भात आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांवर जे आरोप लावले जातं आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदार व्यक्ती आहेत, अशा प्रकरणात फोन करण्याची शक्यता नाही. त्यामुळे पवारांचा कुठलाही संबंध नसून डॉक्टरांना अटक करण्यात आली असल्याचं आठवले यांनी म्हटलं. अजित पवारांनी फोन केला होता हे चुकीचे असून या प्रकरणात सरकार गंभीर आहे. तसेच, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केले. 


राजगड घटनेचा निषेध


जमिनीच्या वादातून एका 23 वर्षीय मुलीला राजगड येथे जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर निषेध व्यक्त करत आठवलेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली. मुलीवर अत्याचार झाला हे दुर्दैवी आहे, देशामध्ये महिलांना सन्मान देणे आवश्यक असतांनाही समाजामध्ये चुकीच्या मानसिकतेमुळे महिलांवर बलात्कार सारख्या गंभीर घटना होत आहेत. समाजाच्या लोकांनी अश्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे, आणि अशा मानसिकतेला उध्वस्त करणे आवश्यक आहे. पोलिसांनी आरोपीना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणीही आठवलेंनी राजगड येथील घटनेनंतर केली आहे.