हिंगोली : शिवसेना-काँग्रेस नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे हिंगोलीत पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर टारफे यांनी बांगर यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.


तसेच बांगर यांच्या अटकेसाठी टारफे यांनी हिंगोलीत आंदोलन केले. बांगरविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत सेनेकडून औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.

टार्फे आणि बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे हिंगोलीत कडक पोलीस बंदोबस्ट ठेवण्यात आला आहे. हा विषय इथेच संपला नसून काँग्रेसच्या वतीने आज हिंगोली शहरात संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे आता जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.