Asha Buchake :  राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar)  ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी  (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे.


तर या संपूर्ण प्रकारानंतर आशा बुचके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान, ब्लड प्रेशर लो झाल्यानंतर आशा बुचके यांना अचानक भोवळ आल्याचे बघायला मिळाले. परिणामी त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.


जुन्नर विधानसभेत नेमकं चाललंय तरी काय?


तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल केल्यानंतरही आशा बुचके यांनी उपचार घेण्यास विरोध दर्शवला. दरम्यान, रुग्णालयात हे नाराजीनाट्य रंगल्याने काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता. असे असताना काँग्रेस नेते आणि मविआकडून जुन्नर विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे सत्यशील शेरकर यांनी आशा बुचके यांची रुग्णालयात अचानक भेट घेऊन समजावून सांगत उपचार घेण्यास विनंती केली. शेरकर यांनी आशा बुचके यांना पाणी पाजून ऑक्सिजनही लावला. रुग्णालयात दाखल असतानाही आशा बुचके यांच्याकडून मात्र अजित पवार यांचं करायचं काय, हाय हाय च्या घोषणा सातत्याने सुरूच ठवल्या. एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलंय. तर काँग्रेस नेत्यांनी आशा बुचके यांची रुग्णालयात अचानक भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. परिणामी, जुन्नर विधानसभेत नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न या निमित्याने उपस्थीत केला जातोय.


नेमकं प्रकरण काय? 


भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके या आज काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली असताना इथे हा प्रकार घडला.  आज जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचकेंनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं.


देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकला आहे. शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचकेंनी केला आहे. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे.


हे ही वाचा