Mumbai : मालेगावमधील काँग्रेसच्या माजी आमदार आणि महापौरांसह नगरसेवकांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे पडसाद आता महाविकास आघाडीवर उमटत आहेत. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेत दिले आहेत. "महाविकास आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांचा राग आला आहे. परंतु, मोठ्यांनी चूक केली तर लहानही काय करु शकतात हे दाखवले, असा टोला नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला आहे.
परभणीत आज राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला इशारा दिला. ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार असून सर्व पक्षांमध्ये समन्वय असावा अशी आमची भूमिका होती. आमच्या सहकारी पक्षांनी मालेगाव, भिवंडीमध्ये जे काही केलं त्याचा राग आहे, परंतु, द्वेष नाही. मोठ्यांनी मोठ्या पद्धतीनं राहिलं तर सन्मान होतो. मात्र, मोठ्यांनीच चुकीच्या पद्धतीनं वागलं तर लहानही मोकळा राहू शकतो हाच संदेश आम्ही देत आहोत, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.
"कुणाला पक्षात घ्यायचं असेल तर आम्ही विचारत होतो. पण इतर पक्षात कोणाला घ्यायचं असेल तर आम्हाला विचारलं जात नाही. आज आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही कोणाला प्रलोभने देत नाही, कोणाशी स्पर्धा नाही, प्रत्येकानेच समन्वयाने वागावे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून सरकार वेगळे आणि पक्ष वेगळे आहेत. परंतु, महाविकास आघाडीत यामुळे कुरबुरी नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही कडाडून टीका केली. 15 मार्च नंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन करणार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, "भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सतत अशी वक्तव्य करून राज्याची आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे."
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही नाना पटोले यांनी टीका केली. "आसामचे मुख्यमंत्री देशाच्या आईवर बोलले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही संस्कृती आहे का? ही हिंदुस्थानची संस्कृती आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही हिंसेने उत्तर देणार नाही. मात्र जनता त्यांना माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असा टोला नाना पटोले यांनी यावेळी लगावला.
कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरूनही नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. "देशभरातील तरूण आज बेरोजगार झाला आहे. या तरूणांना रोजगार देता येत नाही. त्यामुळे हिजाबसारखे मुद्दे चर्चेत आणले जातात. निवडणुका आल्या की समाजात भाजप फूट पाडत असते. भाजपचा सर्व निवडणुकांमध्ये पराभव होत आहे. त्यामुळे त्यांना असे मुद्दे चर्चेत आणावे लागत आहेत. रोजगार देणं, देश वाचवणं ही सध्याची वेळ आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान करत असाताना भाजपचे सदस्य बाकं वाजवत होते. याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या